बेळगाव महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आज सकाळ सकाळीच शहराचा पाहणी दौरा आखला होता. या दौऱ्यादरम्यान विविध ठिकाणी भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.
आज सकाळी ६ वाजल्यापासून पालिका आयुक्तांनी शहराचा पाहणी दौरा आखला. यादरम्यान त्यांनी सदाशिव नगर येथील गॅरेजला भेट देऊन वाहनचालकांच्या हजेरीची तपासणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील भुयारी मार्गाची पाहणी करून याठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपसेटची मदत घेण्याची सूचना केली.
त्यानंतर नानावाडी भागात गेल्यानंतर तेथील नाल्याची पाहणी केली. नाल्यासंदर्भात उद्भवलेल्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. याचप्रमाणे वडगाव बिट कार्यालयास भेट देऊन तेथील स्वच्छता कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वितरण केले. यासह जुना पी बी रोड, नरगुंदकर भावे चौक येथील रस्त्यांची पाहणी करून दक्षिण आणि उत्तर कार्यकारी अभियंत्यांना सूचना दिल्या. यानंतर गांधीनगर, न्यू गांधीनगर आणि अमन नगर येथे भेट देऊन तेथील स्वच्छतेची पाहणी केली. तुंबलेल्या गटारी पाहून तात्काळ गटारी स्वच्छ करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

सर्व प्रभागांमध्ये डेंग्यू, मलेरिया प्रतिबंधासाठी औषधांची फवारणी करण्यात यावी, दररोज फॉगिंग मशीनद्वारे औषधांची फवारणी करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.


Recent Comments