मुसळधार पावसामुळे बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे राकसकोप जलाशय पूर्णपणे भरले असून इतिहासात प्रथमच हे जलाशय जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात इतक्या वगेआने भरले आहे. जलाशयात वाढलेली पाण्याची आवक लक्षात घेत जलाशयाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.
गेल्या दोन दिवसात धरण आणि पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. पश्चिम घाटात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहात असून परिणामी राकसकोप जलाशयातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. या जलाशयात २४७८ फूट पाण्याची नोंद झाली असून बेळगावकरांच्या पाण्याचा प्रश्न यंदा सुटला आहे.

जलाशयात वेगाने वाढत असलेल्या पाणीपातळीमुळे दोन दरवाजे उघडण्यात आले असून दरवाजाजवळ काही मासे अडकल्याचेही पाहायला मिळाले आहे. मासे हटविण्यासाठी जलाशय कर्मचाऱ्यांची धावपळ सुरु असून जलाशयाच्या इतिहासात प्रथमच सुमारे १० किलो मासा आढळून आला आहे. जलाशयात होणाऱ्या अतिरिक्त पाणी साठ्यामुळे जलाशय परिसरात असणाऱ्या हजारो हेक्टर शेतजमिनींना पुराचा धोका निर्माण झाला आहे.
पावसाचा वाढता जोर, नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत होणारी वेगाने वाढ यामुळे जलाशय परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


Recent Comments