बेळगावच्या मारुतीनगर येथील नागरिक गेल्या ३० वर्षांपासू नरक यातना सोसत आहेत. पावसाळ्याला सुरुवात झाली कि याठिकाणी रस्त्यांवर पाणी साचून रस्त्यांना तलावाचे स्वरूप येते. अनेकवेळा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे मागण्या करूनही अद्याप हा भाग दुर्लक्षित ठेवण्यात आल्याने नागरीकातून संताप व्यक्त होत आहे.
केवळ निवडणुका जवळ आल्या कि नागरिकांच्या समोर हात जोडणाऱ्या लोकप्रतिनिधींनी मारुती नगर परिसराकडे पाठ फिरवली आहे. एकीकडे राज्याची दुसरी राजधानी म्हणून बेळगावचा विकास करण्यात येत आहे. मात्र येथील उपनगरांमधील जनतेच्या व्यथा सोडविण्यात मात्र प्रशासन कुंभकर्णाची भूमिका घेऊन पुढे जात आहे. अद्यापही मारुतीनगर आणि यासारख्या अनेक उपनगरांमधून मूलभूत सुविधाही पोहोचविण्यात आलेल्या नाहीत. मारुतीनगर मध्ये उद्भवलेल्या समस्यांमुळे येथील नागरिकांचे हाल होत आहेत.

गेल्या तीस वर्षांपासून मारुती नगरमध्ये ही समस्या भेडसावत आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे घराबाहेर पडणे मुश्किलीचे बनले आहे. शालेय विद्यार्थ्यांना याच पाण्यातून मार्ग काढून जावे लागते. सध्या सर्वत्र डेंग्यूचा प्रसार वाढला असून अशा साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या सारख्या संसर्गजन्य आजाराने येथील नागरिक भयभीत झाले आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने येथे येऊन आमचा प्रश्न सोडवावा, अशी विनंती येथील नागरिकांकडून केली जात आहे.
उन्हाळा असो किंवा पावसाळा मूलभूत सुविधांच्या अभावामुळे येथील नागरिक नेहमीच समस्येच्या गर्तेत जगत आहेत. याबाबत अनेकवेळा संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊनही आश्वासनांपलीकडे येथील नागरिकांनाच कोणताच दिलासा मिळत नाही, अशी तक्रार येथील महिलांनी केली आहे. रस्त्यांवर साचलेले पाणी, साथीच्या आजाराची भीती आणि नागरिकांची होत असलेली कुचंबणा हि परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने हि समस्या सोडवावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.


Recent Comments