Belagavi

टोमॅटोने गाठली शंभरी!

Share

संततधार पावसामुळे टोमॅटो उत्पादनावर परिणाम झाला असून गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर सतत चढत्या दरातच आहेत. ५० ते ६० रुपये किलो या दराने विक्री होणार टोमॅटो सध्या शंभर रुपये दरावर जाऊन पोहोचला आहे, यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

महाराष्ट्रासह राज्यातील इतर भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील बाजारपेठेत टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी टोमॅटोचा सरासरी भाव 50 ते 60 प्रति किलो होता. खडे बाजार, रविवार पेठ, कांदा मार्केट यासह जिल्ह्यातील बहुतांश बाजारपेठेत सोलापूर, कोल्हापूर, नाशिक सातारा, महाराष्ट्र आदी भागातून टोमॅटोचा पुरवठा केला जात आहे. टोमॅटो उत्पादन घेतले जाते त्या भागात सततच्या पावसामुळे पिकाचे नुकसान झाले असून परिणामी टोमॅटोच्या दरात वाढ होत चालली आहे. येत्या आठवड्याभरात पुन्हा दर वाढण्याची शक्यता विकेत्यांनी वर्तविली आहे.

राज्यात अतिवृष्टीनंतर काढणी कमी झाली असून आता दक्षिण महाराष्ट्रात पिकवलेल्या टोमॅटोचा पुरवठा होत असल्याचे भाजीविक्रेते सांगत आहेत. दक्षिण महाराष्ट्रातून पुरवठा करण्यात आलेल्या भाजीपाल्याचे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे बेळगावच्या बाजारात टोमॅटोचा प्रतिकिलो भाव 100 रुपये झाल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले.

दैनंदिन वापरातील वस्तूंचा वाढता दर अशातच भाजीपाल्याचे वाढलेले दर यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत असून नेहमीपेक्षा कमी भाजीपाला खरेदी करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया काही नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.

Tags: