बेळगावला मॉडेल शहर बनविण्याचे आपले उद्दिष्ट्य असून मेट्रोच्या धर्तीवर बेळगावचा विकास साधण्याचा आपला मानस आहे, अशी प्रतिक्रिया खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केली. बेळगाव उत्तर भाजपच्या वतीने अनसुरकर गल्ली येथील छत्रे वाड्यात नूतन खासदारांच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडल्यानंतर भाजप नेत्यांच्या हस्ते खासदार जगदीश शेट्टर यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार स्वीकारल्यानंतर बोलताना खासदार जगदीश शेट्टर म्हणाले की, रिंगरोड आणि उड्डाणपूलासंदर्भात आपण केंद्रीय मंत्र्यांना विनंती केली असून, मंत्रिमंडळाने प्रत्येक 15 दिवसांतून एकदा बेळगावातील सर्व नेते आणि आमदारांची भेट घेऊन त्यांच्या कामकाजाबाबत आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. मेट्रो शहराच्या धर्तीवर आपण बेळगावचा विकास साधणार असून यापूर्वीच्या कारकिर्दीप्रमाणे यापुढे देखील आपण विकासाचेच ध्येय जपणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी माजी आमदार अनिल बेनके बोलताना म्हणाले की, जगदीश शेट्टर हे ६ वेळा आमदार त्याचबरोबर मंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहिले आहेत. बेळगावच्या खासदारपदी त्यांची निवड झाली याचा आम्हाला अभिमान आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघातील मराठी, लिंगायत, दलित समाजाच्या पाठिंब्यामुळे भाजपने विजय साधल्याचे बेनके म्हणाले.

या कार्यक्रमास गीता सुतार, हनुमंत निरानी, नगराध्यक्षा सविता कांबळे, रमेश देशपांडे, राजशेखर डोणी, इरय्या खोत, विजय कोडगुनुर, भाजप नेते, पदाधिकारी यांच्यासह बहुसंख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


Recent Comments