Belagavi

रायगड किल्ले परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस: किल्ल्यावर आलेले पर्यटक अडकले

Share

रायगड किल्ले परिसरात रविवारी सायंकाळी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे इतिहासात प्रथमच किल्ल्याच्या पायऱ्यांवरून अक्राळ विक्राळ स्वरुपात पाणी वाहू लागल्याने किल्ल्यावर आलेले पर्यटक अडकले होते

कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने रविवारपासून अक्षरशः थैमान घातले आहे. रायगड किल्ले परिसरात काल सायंकाळी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे इतिहासात प्रथमच किल्ल्याच्या पायऱ्यांवरून अक्राळ विक्राळ स्वरुपात पाणी वाहू लागल्याने किल्ल्यावर आलेले पर्यटक अडकले होते. सुदैवाने हे सर्व पर्यटक सुरक्षित आहेत. परंतु ही अचानक उद्भवलेली आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून ३१ जुलैपर्यंत रायगड किल्ल्याकडे जाणारा पायरी मार्ग बंद करण्याचा मोठा निर्णय महाड तालुका प्रशासनाने घेतला आहे.

दुसरीकडे, बुरुज आणि कड्यांवरून अक्षरशः धबधब्याप्रमाणे पावसाचे पाणी वाहत होते. ही भयानक परिस्थिती किल्ले रायगडाच्या महादरवाजा परिसरात निर्माण झाली होती. यावेळी मोठ्या संख्येत पर्यटक शिवप्रेमी रायगडावर होते. अनेक पर्यटक या दरम्यान तारेवरची कसरत करत वाहत्या पाण्यातून मार्ग काढत उतरत होते. त्यातील एका पर्यटकाने रायगडावरील दृश्याचे मोबाईल चित्रिकरण केले असून ते व्हायरल झाले आहे.

रायगड जिल्ह्यातील सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ८ जुलैपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे. रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरिकेटिंग करून बंद करण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. तसेच सद्यस्थितीत किल्ले रायगडावर असलेले पर्यटकाना रोप वेने गडावरुन उतरवण्यात येत आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी प्रशासनाकडून रोपवे बंद करण्यात आला आहे.

Tags: