Belagavi

जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडी काउंटरसमोर साचले तळे! नागरिकांचे हाल!

Share

नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणाऱ्या जिल्हा रुग्णालयाच्या समस्यांची मालिका संपेल असे चित्र दिसत नाही. पावसाळा सुरु झाला कि साथीच्या आजारांचे प्रमाण अधिकच वाढते. या आजारांवर उपचार घेण्यासाठी अनेक रुग्ण जिल्हा रुग्णालयात येतात. परंतु जिल्हा रुग्णालयातील समस्यांमुळे अनेक नागरिक सध्या हैराण झाल्याचे चित्र दिसत आहे.

एकीकडे जिल्हा रुग्णालयाच्या सुधारणेसाठी होत असलेले प्रयत्न, जिल्हा रुग्णालयातील सुविधा, सोयी, उपचार पद्धती या सर्वच गोष्टींचा दर्जा सुधारण्यासाठी होत असलेले प्रयत्न आणि दुसरीकडे जिल्हा रुग्णालयात उद्भवणाऱ्या नेहमीच्याच समस्या यामुळे नागरिक जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर नेहमीच ताशेरे ओढत असतात. आज येथील ओपीडी काउंटरसमोर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांची आणि नातेवाईकांची गैरसोय झाली. लहान मुलांसमवेत आलेल्या पालकांना कित्येक वेळ ताटकळत उभे राहावे लागले.

जिल्हा रुग्णालयात बेळगाव शहर आणि तालुक्यासह परगावचेही अनेक नागरिक उपचारासाठी येतात. उपचाराला सुरुवात करण्यापूर्वी ऍडमिशन फॉर्म भरणे अनिवार्य असते. मात्र यासाठी नागरिकांना तासंतास ताटकळत उभे राहावे लागते, हि बाब नेहमीचीच झाली आहे. कधी सर्व्हर डाऊन तर कधी आणखी काही तांत्रिक अडचणी यामुळे येथील काउंटरवर नेहमीच नागरिकांची झुंबड उडते. तासनतास रांगेत उभं राहावं लागल्यामुळे आपापसात वादावादीचेही प्रसंग घडतात.आजदेखील असाच प्रकार निदर्शनात आला असून पावसाचे पाणी ओपीडी काउंटरसमोर साचल्याने नागरिकांकडून जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात येत होते.

विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी आलेले रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे आज जिल्हा रुग्णलयातील असुविधेमुळे मोठे हाल झाले. सकाळपासून रांगेत उभं राहून वैतागलेल्या अनेक नागरिकांनी जिल्हा रुग्णालयाच्या या सावळ्या गोंधळावर संताप व्यक्त केला.

यावेळी उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले कि, आपल्या मुलाला भटक्या कुत्र्याने चावले आहे. यावर उपचार घेण्यासाठी आपण सकाळपासून रांगेत उभं राहून ऍडमिशन फॉर्म भरण्यासाठी थांबलो असून जिल्हा रुग्णालयातील वेळेच्या योग्य नियोजनाअभावी येथील व्यवस्था कोलमडली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष पुरविण्याची गरज असल्याचे मत महम्मद गौस मुल्ला यांनी व्यक्त केले.

बेळगाव जिल्ह्याची व्याप्ती मोठी आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे नागरिक जिल्हा रुग्णालयात विविध उपचार घेण्यासाठी दाखल होतात. मात्र याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची नेहमीच या ना त्या कारणामुळे परवड होते. कधी ऍडमिशन फॉर्म भरणाऱ्या काउंटरवर तर कधी आणखी कोणत्या कारणामुळे.. नागरिकांना तासंतास रांगेत ताटकळत उभं राहावं लागणं हे जिल्हा रुग्णालयातील नेहमीचेच कारण नागरिकांच्या गैरसोयीचे कारण ठरत आहे. इमारतीचा विकास, उपकरणे यासारख्या विकासासह रुग्णांच्या मूलभूत गरजा आणि मूलभूत सुविधांकडे देखील रुग्णालय प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष पुरविणे गरजेचे आहे.

Tags: