Belagavi

केएलस जेएनएमसी जलतरण तलावात देशप्रेमाचे दर्शन

Share

बेळगाव येथील केएलई इन्स्टिट्यूटच्या जेएनएमसी जलतरण तलावात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.

जमिनीवर योगाभ्यास करणे सामान्य आहे. पण, पाण्यात विविध योगासने पाहणे हा एक थरारक अनुभव आहे. हा अनुभव जागतिक योगदिनाच्या औचित्याने के एल एस जलतरण तलावात अनुभवायला मिळाला. आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग व लहान मुलांनि राष्ट्रध्वज हातात धरून जलयोगासनांचे विविध प्रकार सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.

लहान मुले, तरुण-तरुणींनी जलतरण तलावात जलयोगाच्या विविध आसनांची प्रात्यक्षिके करून दाखविली. वीरभद्रासन, पद्मासन, निद्रासन, हनुमानासन, त्रिकोनासन, वृक्षासन, पर्वतासन, मुद्रासन यासह अनेक आसनांचे प्रदर्शन करून उपस्थितांचे लक्ष वेधले. हातात राष्ट्रध्वज घेऊन विविध आसने करणारे जलतरणपटू विशेष लक्ष वेधत होते. मार्चिंग फॉर्मेशन, अंडरवॉटर स्विमिंग, ट्रेन फॉर्मेशन, ग्लास होल्डिंग, सर्कल फॉर्मेशन आणि इतर विभागात वेगवेगळी योगासने करण्यात आली हेही विशेष.

यावेळी प्रतिक्रिया देताना विधान परिषदेचे माजी सदस्य आणि केएलईचे संचालक महांतेश कवटगीमठ म्हणाले की, कोणतीही गोष्ट साध्य करण्याची जिद्द, सतत मेहनत आणि समर्पण असेल तर मुले काहीही साध्य करू शकतात, हे येथील जलतरणपटूंनी दाखवून दिले आहे. भविष्यात या सर्वांना आणखी यश मिळो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. तसेच उपस्थित मान्यवरांनीही मुलांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी महांतेश कवतीगीमठ, विजय मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: