पती-पत्नीचे नाते सातजन्मी लाभावे, अशी प्रार्थना करत अनेक सुवासिनींनी ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमेच्या निमित्ताने पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाला फेऱ्या मारून वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली.
व्हॉइस : बेळगाव शहर आणि परिसरात विविध ठिकाणी महिलावर्गाने वटवृक्षाची पूजा केली. जन्मोजन्मी हाच पती मिळावा, असे साकडे घालत वटवृक्षाच्या झाडाला सुवासिनी नटून-थटून आपल्या पतीराजाच्या आयुष्यासाठी साकडे घालताना दिसत होत्या. शहरासह ग्रामीण भागात सुवासिनींनी सकाळपासूनच आपल्या उपवासाची तयारी करून वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी नियोजन केले होते. आरटीओ सर्कल नजीक असणाऱ्या वटवृक्षाच्या पूजेसाठी महिलांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
आपण हे व्रत कशासाठी करतो याबद्दल अनेक महिलांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींनी पारंपरिक सण जपत असल्याचे सांगितले तर काहींनी पतिराजाच्या दीर्घायुष्यासाठी तसेच जन्मोजन्मी हाच पती लाभू देत यासाठी आपण प्रार्थना केल्याचे सांगितले. तर काही महिलांनी समाजात पती – पत्नींमध्ये कमी होत असलेल्या सामंजस्याविषयी प्रतिक्रिया दिली. समाजात अनेक जोडप्यांमध्ये सामंजस्याचा अभाव असल्याने कित्येक नाती तुटतात. परंतु प्रत्येकाने समजुतीने वागून आपले नाते टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे काही महिलांनी सांगितले.
काही महिलांनी हिंदू संस्कृतीतील परंपरा आणि चालत आलेल्या रितीरिवाजानुसार आपण हा सण साजरा करत असल्याचे सांगितले. यावेळी सौभाग्याचं लेणं मानले जाणारे हळद-कुंकू लावून आंब्याचे वाण देऊन ओटी भरण्यात आली. काही महिलावर्ग आपल्या पतिराजांसमवेतच उपस्थित असल्याचे दिसून आले. तर काही महिला आजी, आई, सासू अशा तीन पिढ्यांसह एकत्रित वटपौर्णिमेचे व्रत करताना दिसत होत्या.
आवर्जून नेसलेली भरजरी साडी, सोबत दागिन्यांचा शृंगार करत अनेक महिलांनी वडासोबत सेल्फी घेत नातलग, मैत्रिणींसह सोशल मीडियावर शेअरही केली. नवविवाहित महिलांसाठी आजचा दिवस विशेष आनंदाचा आणि उत्साहाचा होता. यामुळे बहुसंख्य नवविवाहितांना सेल्फी आणि रिल्सचा मोह आवरता आला नाही. गुरुवारी सायंकाळी अचानक सुरु झालेल्या पावसाने शुक्रवारी सकाळी उघडीप दिल्याने महिलावर्गातून समाधान व्यक्त होत होते. शिवाय सकाळपासूनच महिलांनी पूजेसाठी गर्दी केल्याचे दिसून आले.


Recent Comments