Uncategorized

विजयपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हडगली ग्रामपंचायतीला घेराव

Share

पीक विमा योजनेत विम्याचा हप्ता भरण्यात आला असला, तरी दुष्काळामुळे पावसाअभावी शेतकऱ्यांचे नुकसान झाले असतानाही त्यांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले नसल्याबद्दल हडगली येथील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

शेतकऱ्यांनी विजयपूर जिल्ह्यातील हडगली ग्रामपंचायतीला घेराव घालून निषेध व्यक्त केला. शेतकरी संपर्क केंद्राच्या कृषी अधिकारी जयाप्रदा दशवंत यांनी आंदोलक शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र वरिष्ठांना घटनास्थळी बोलवावे, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्यात यावी तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

त्यानंतर त्या ठिकाणी आलेले कृषी विभागाचे सहसंचालक डॉ. विल्यम राजशेखर, सहाय्यक कृषी संचालक शिवनगौडा पाटील, एस.ए. इनामदार, कृषी अधिकारी लिंगराज तालिकोटी, तालुका पंचायत मुख्याधिकारी के. होंगय्या, तालुका योजनाधिकारी कविता इळगी आदींनी शेतकऱ्यांची मनधरणी करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. शेतकऱ्यांच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून देऊन पीक विमा नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

सहाय्यक कृषी संचालक शिवनागौडा पाटील यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी शेतकरी नेते मुदुकप्पा बळूवल, इराप्पा अक्कीहुग्गी, संगमेश पत्तार, अशोकगौडा पाटील, अब्बासली मुल्ला, निंगाप्पा हंगरगी, ईश्वरप्पा सीलिन, नागेश अवरादी आदी उपस्थित होते. विजयपुर ग्रामीण पीएसआय एस.बी. पत्तार, पोलीस कर्मचारी संजू पुजारी यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Tags: