दुष्काळी भाग म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या विजयपुर जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे काही शेतकरी सुखावले आहेत तर काही शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
मागील वर्षी जून महिना संपत आला तरी विजयपूर जिल्ह्यात पाऊस न पडल्याने बळीराजा अस्वथ होता. मात्र यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली असून आठ दिवसानंतर गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. उत्तर कर्नाटकातील कृष्णा नदीच्या पलीकडे बांधलेल्या अलमट्टी जलाशयातील पाण्याची आवक कमी झाली असून आज 4,654 क्युसेकची आवक नोंदवण्यात आली. अल्लमट्टी जलाशयातील पाणीसाठ्यात तिसऱ्या दिवशीही वाढ झाली. कालपर्यंत २४.०८१ टीएमसी पाणीसाठा होता. आज 24,446 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून सातत्याने वाढत असलेल्या आवकेत आज घट झाली आहे.
मुसळधार पावसामुळे बसवन बागेवाडी शहरातील हत्तरकीहाळ रस्त्यावर बांधण्यात आलेला टक्कळकी शाखा कालवा फुटून मोठ्या प्रमाणात पाणी शेतकऱ्यांच्या जमिनीत शिरून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे बसवन बागेवाडी परिसरात टक्कळकी मुख्य कालव्याचे काम अर्धवट अवस्थेत राहिले आहे. परिणामी कालवा फुटल्याने शेतजमिनीत पाणी शिरले आहे. यामुळे या भागातील शेतकरी अडचणीत सापडले असून सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी येथील शेतकरी महांतेश आगसार यांनी केली आहे.
पावसामुळे जिल्ह्यातील कोल्लार तालुक्यातील कुडगी गावात इब्राहिमसाब तालिकोटी या शेतकऱ्याचा लाखो रुपयांचा कांदा पाण्यात वाहून गेल्याची दुसरी घटना घडली आहे. कांद्याचे शंभर ते दीडशे पोत्यांचे नुकसान झाले आहे. घराची पडझड झाली आहे, भिंत कोसळली आहे, शेताचा बांध तुटला असून, मुसळधार पावसामुळे दोन लाख रुपयांच्या कांद्याचे नुकसान झाले आहे. घरातील वस्तूही पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्या आहेत.
या भागात पाऊस पडला किंवा पडला नाही दोन्ही परिस्थितीत शेतकरी अडचणीत येतो. मात्र या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देऊन त्यांना दिलासा कोण देणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


Recent Comments