पावसाळ्यच्या पूर्वतयारीबाबत आज महानगर पालिकेच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना आणि खबरदारी घेण्याच्या सूचना महापौर सविता कांबळे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
बेळगाव महानगरपालिकेच्या सभागृहात महापौर सविता कांबळे व उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात प्रचंड त्रास सहन करावा लागतो. नाल्यांमध्ये पाणी सुरळीतपणे वाहत नाही त्यामुळे हि समस्या उद्भवते. यामुळे नाल्यांमधील गाळ काढून टाकावा. ड्रेनेजसंबंधी तक्रारी आल्यास दुरुस्तीसाठी आवश्यक कर्मचारी उपलब्ध असावेत. शहराच्या स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही समस्या उद्भवून जनतेला अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी हेस्कॉमचे अधिकारी, पाणी पुरवठा मंडळाचे अधिकारी, वनविभागाचे अधिकारी या सर्वांचा सहभाग आवश्यक आहे अशा सूचना महापौरांनी दिल्या. यावेळी महापालिकेतील काही सदस्यांनीही अनेक समस्या मांडल्या.
सखल भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी नाल्यांमधील पाणी सुरळीतपणे वाहून जावे, यासाठीच्या उपाययोजनांची माहिती महापौर सविता कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्व विभागांना कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या .
बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त पी.एन.लोकेश यांनी सांगितले की, महापालिका सदस्य, महापौर, उपमहापौर यांच्या नेतृत्वाखाली मान्सून पावसाचा इशारा देणारी बैठक झाली, या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अनेक समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी आणखीन बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

करमाफीची मुदत वाढवण्याबाबत बोलताना महापालिकेचे महापौर व सदस्य म्हणाले की, लोकसभा निवडणूक आली असल्याने जनतेला कर भरण्यात अडचणी आल्या. त्यामुळे मुदत वाढवून देण्याची मागणी सरकारला केली असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत स्थायी समिती अध्यक्षांसह इतर विभागाचे अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.


Recent Comments