एक व्यक्तीच्या नेत्रदानाने दोघांच्या आयुष्यातील अंधार दूर होऊ शकतो त्यासाठी प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा असे आवाहन नंदादीप हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालिका डॉ ज्योत्स्ना पाटील यांनी केले
तसेच डोळ्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे असल्याचे सांगत असताना खूप कमी लोक याबाबत जागरूक असल्याचे सांगितले.
जायंट्स आय फौंडेशन, जायंट्स मेन आणि नंदादीप हॉस्पिटलच्या वतीने नेत्रदान जनजागृती आणि मोफत नेत्रतपासणी कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर आय फौंडेशनचे अध्यक्ष शिवराज पाटील, संस्थापक मदन बामणे, जायंट्स मेनचे अध्यक्ष अविनाश पाटील,नंदादीपच्या डॉ ज्योत्स्ना पाटील,डॉ चंद्रशेखरय्या हिरेमठ डॉ श्रुती रेवणकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आय फौंडेशनचे संस्थापक मदन बामणे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी १० जून हा दिन नेत्रदान संकल्प दिवस किंवा ‘जागतिक दृष्टिदान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या माध्यमातून लोकांमध्ये नेत्रदानाची जनजागृती केली जाते.
जागतिक दृष्टीदान दिनाचं सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजेच लोकांना नेत्रदानाचं महत्त्व पटवून देणे आणि नेत्रदानाविषयी जनजागृती करून लोकांना मृत्यूनंतर डोळे दान करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करणे असा आहे. यासाठीच सहा वर्षांपूर्वी जायंट्स आय फौंडेशनची स्थापना झाल्याचे सांगितले.
अध्यक्ष शिवराज पाटील यांनी फौंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही नेत्रदान दिन आणि आय फौंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त व्याख्याने, जागृती फेरी व इतर माध्यमातून जनजागृती करत असतो.
भारतासह अनेक देशांमध्ये आजही अंध व्यक्तींची संख्या कोटीच्या घरात आहे त्यांना आपण जास्तीतजास्त मरणोत्तर नेत्रदान करून त्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर करूया असेही शिवराज पाटील यांनी सांगितले.
यावेळी जायंट्सच्या वतीने मान्यवरांचा स्मृतिचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला तसेच नंदादीप हॉस्पिटलच्या वतीने अविनाश पाटील यांना शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर उपस्थित नागरिकांची नेत्रातपासणी करण्यात आली. जवळपास पन्नासहुन अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला.
नेत्रातपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी आनंद तुप्पद,वीरभद्र कुंभार आणि प्रदीप चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी जायंट्स मेनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भरत गावडे तर आभार विश्वास पवार यांनी मांडले.


Recent Comments