Belagavi

अर्भक विकण्याचा प्रयत्न : पाच जणांना अटक

Share

बेळगाव पोलिसांनी बाल तस्करीच्या जाळ्याचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

जिल्हा बाल संरक्षण युनिट शासकीय दत्तक केंद्राचे समन्वयक राजकुमार सिंगाप्पा राठोडा यांनी माळमारुती पोलीस स्थानकात बेकायदेशीर रित्या अर्भक विक्रीचा गुन्हा नोंदविला असून, १) महादेवी ऊर्फ प्रियांका बाहुबली जैनर (रा. नेगीनहाळ, ता. बैलहोंगल), २) डॉ. अब्दुलगफार हुसेनसाब लाडखान (मूळ रा. हंचिनाळ, ता. सौंदत्ती, सध्या रा. सोमवार पेठ, कित्तूर), ३) चंदन गिरीमल्लाप्पा सुभेदार (रा. तुरकर शिगेहळ्ळी, ता. बैलहोंगल),

४) पवित्रा सोमाप्पा मडीवाळकर (रा. संपगाव, ता. बैलहोंगल) व ५) प्रवीण मंजुनाथ मडीवाळकर (रा. होसट्टी, ता. जि. धारवाड) अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पूर्वी नर्स म्हणून कार्यरत असलेल्या महादेवी ऊर्फ प्रियांका हिला अवघ्या एक महिन्याचे अर्भक ६० हजारांना कंपाऊंडरने विकले. १४०००० इतक्या रक्कमेला सुरुवातीला हा व्यवहार ठरविण्यात आला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आरोप फेटाळून लावण्यात येत असून याप्रकरणी चौकशीअंती सत्य बाहेर येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग यांनी दिली.

पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग, कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश, डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अर्भक विक्रीसाठी आलेल्या महादेवीला ताब्यात घेतल्यानंतर या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

Tags: