विजयपूर लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार रमेश जिगजीनगी यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून भरघोस मताधिक्य घेत काँग्रेसचे उमेदवार प्रा. राजू अलगूर यांचा पराभव केला आहे.
विजयपूर जिल्ह्यातील अधिकाधिक आमदार हे काँग्रेस पक्षाचे असूनही या भागातून लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपच्या उमेदवाराला पसंती दिली. ९ विधानसभा मतदार संघांपैकी ६ मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार असून भाजप आणि जेडीएस पक्षाकडे प्रत्येकी एक आमदार असे संख्याबळ विजयपूर जिल्ह्यात आहे. मुद्देबिहाळ, बसवन बागेवाडी, बबलेश्वर, नागठाण, इंडी आणि सिंदगी आदी मतदारसंघात काँग्रेसचे आमदार असूनही या भागातील जनतेने काँग्रेसच्या उमेदवारांपेक्षा रमेश जिगजीनगी यांना आघाडीची मते दिली आहेत, हे विशेष. तर दुसरीकडे देवर हिप्परगी मध्येही जेडीएसचे आमदार असून काँग्रेसपेक्षाही अधिक मते भाजपला मिळाली आहेत. या निवडणुकीत प्रा. राजू अलगूर यांना ५९५५५२ मते मिळाली असून रमेश जिगजीनगी यांनी ६७२७८१ मते मिळवत ७७२२९ मताधिक्याने काँग्रेसचा पराभव केला आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी पाहता रमेश जिगजीनगी यांना मुद्देबिहाळमधून ७२६५०, देवरहिप्परगी मधून ७२५६९, , बसवन बागेवाडी मधून ८३९१६, बबलेश्वर मधून ७९००२, विजयपूर शहरातून ८३७१४, नागठाण मधून ९६१५८, इंडीमधून ९५०६४, सिंदगीमधून ८५९८२ आणि पोस्टल मते ३७२६ अशी मतसंख्या रमेश जिगजीनगी यांच्या पारड्यात पडली आहे. तर काँग्रेसचे राजू अलगूर यांना मुद्देबिहाळमधून ६८६८८, देवरहिप्परगी मधून ६३५४३, बसवन बागेवाडी मधून ६६३६३, बबलेश्वर मधून ७५६५१, विजयपूर शहरातून ९२९८४, नागठाण मधून ८४३७३, इंडीमधून ६९३४०, सिंदगीमधून ७२३३५ आणि पोस्टल मते २२७५ अशी मते मिळाली आहेत.
विजयपूर जिल्ह्यातील एकंदर परिस्थिती पाहता अधिकाधिक आमदारांचे संख्याबळ काँग्रेसकडे असूनही या भागातील जनतेने भाजपाला पसंती दिली आहे. आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ, आमदार एम. बी. पाटील यांच्यासारखे आमदार असूनही विजयपूर जिल्ह्यातील नागरिकांनी रमेश जिगजीनगी यांच्या पारड्यात कौल दिला असून विजयपूरमध्ये हमीभावापेक्षा मोदीलाट अधिक प्रभावी ठरली असे मात्र राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.


Recent Comments