राज्याचे लक्ष वेधलेल्या बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. या मतदार संघात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते. एकीकडे राजकारणातील दिग्गज आणि दुसरीकडे नवोदित उमेदवार अशी टक्कर झालेल्या मतदार संघाच्या निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. बेळगावच्या निवडणूक रणधुमाळीचा उद्या जाहीर होणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ‘इन न्यूज’ ने घेतलेला आढावा…..
बेळगाव लोकसभा मतदार संघात मोदी लाट फायद्याची ठरणार? कि हमी योजना करिष्मा दाखवणार?
शेट्टर कि हेब्बाळकर? बेळगावच्या जनतेचा कौल कुणाला मिळणार?
प्रतिष्ठा आणि वर्चस्वाच्या लढाईत कुणाचा विजय होणार?
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाहीर सभा, रोड शो, घरोघरी मतदारांच्या वैयक्तिक पातळीवर घेतलेल्या गाठीभेटी यासह विविध कसरती केल्या आहेत. संपूर्ण मतदार संघ पिंजून काढणाऱ्या लक्ष्मी हेब्बाळकरांना हमी योजनांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे तर बेळगाव मतदार संघात आजवर अनेक वर्षे वर्चस्व असणाऱ्या भाजपच्या अंगडी कुटुंबीयांचा आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचा जगदीश शेट्टर यांना पाठिंबा असल्याची चर्चा आहे.
गेल्या दशकापासून भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या बेळगाव मतदार संघात यावेळी मात्र काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोरदार बळ लावल्याचे दिसून आले. तर देशभरात मोदी लाट असायचा फायदा जगदीश शेट्टर यांना मिळेल असा अंदाज वर्तविण्यात येत असून दोन्ही बाजूनी अटीतटीचा सामना या निवडणुकीत पाहायला मिळाला आहे. २०१९ साली झालेल्या निवडणुकीत बेळगावमध्ये ६७.७० टक्के मतदान झाले होते तर या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला असून ७१.३८ टक्के मतदान झाले आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत ४ टक्के मतदा अधिक झाले असून जगदीश शेट्टर आणि मृणाल हेब्बाळकर यांना फायदेशीर ठरणाऱ्या आणि नुकसानदायक ठरणाऱ्या गोष्टींचा हा आढावा…
भाजपच्या बालेकिल्ल्यात झालेली लढत….
गेल्या पाच निवडणुकांमध्ये भाजपने सलग विजय मिळवला आहे. त्यामुळे बेळगाव लोकसभा मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. भाजप तळागाळात मजबूत आहे हे मागील निवडणुकीत दिसून आले आहे. गेल्या दोन निवडणुकांप्रमाणे यावेळीही बेळगावात मोदी लाट दिसून आली असून जगदीश शेट्टर यांनाही मुख्यमंत्री, मंत्री आणि सभापती म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जगदीश शेट्टर विजयी झाले तर त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांनीदेखील जगदीश शेट्टर यांचा जोरदार प्रचार केला आहे. बेळगावमध्ये भव्य मेळावे झाले आहेत यामुळे जगदीश शेट्टर यांच्या पारड्यात अधिक मते मिळू शकतील का? हे पाहणे उद्या महत्वाचे ठरणार आहे.
काय सांगतो मागील निवडणुकीचा इतिहास?
भाजपने आपल्याकडे शाबूत ठेवलेल्या बेळगाव लोकसभा मतदार संघात २०१४ साली झालेल्या निवडणुकीत भाजपचे सुरेश अंगडी यांनी लक्ष्मी हेब्बाळकर यांचा पराभव केला होता. 2019 च्या निवडणुकीतही सुरेश अंगडी यांनी काँग्रेसच्या विरुपाक्षी साधुन्नावार यांच्या विरोधात विजय मिळवला आणि यावेळी त्यांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीपद मिळाले होते. मात्र, सुरेश अंगडी यांच्या अकाली निधनामुळे 2021 मध्ये बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. मात्र या निवडणुकीतही सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला सुरेश अंगडी यांना उमेदवारी मिळाली आणि पुन्हा या निवडणुकीत काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांचा पराभव झाला आणि हा मतदार संघ पुन्हा भाजपच्याच हातात आला.
देशातील मोदी लाट आणि कर्नाटकातील हमी योजना, एकीकडे हिंदुत्वाचा मुद्दा तर दुसरीकडे विकासाचा मुद्दा अशा मुद्द्यांवर झालेल्या या निवडणुकीत विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे उद्या जाहीर होणाऱ्या निकालातून स्पष्ट होणार आहे.
पोलिटिकल ब्युरो, इन न्यूज मराठी, बेळगाव


Recent Comments