‘हर काम देश के नाम’ या घोषवाक्यांतर्गत बेळगावमधील सांबरा वायुसेना प्रशिक्षण केंद्रातून अग्निवीर अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींच्या दीक्षांत संचलन सोहळा दिमाखात पार पडला.
सांबरा वायुसेना प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षण घेणाऱ्या अग्निवीर तुकडीतील २६१४ प्रशिक्षणार्थींनी आज देशसेवेची शपथ घेतली. २२ आठवड्यांपासून सुरु असलेले प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेसाठी सज्ज झालेल्या अग्नीवर सैनिकांचा आज दीक्षांत संचलन सोहळा विविध मान्यवरांच्या उपथितीत दिमाखात पार पडला. यावेळी एअर कमांडिंग ऑफिसर एअरवाईस मार्शल आर. रविशंकर यांनी दीक्षांत पथसंचलनाचे निरीक्षण केले. तसेच त्यांनी प्रशिक्षणार्थींना भवितव्यासाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.
आपल्याला दिलेली देशसेवेची जबाबदारी मनापासून, प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडून प्रशिक्षणांतर्गत दिलेल्या सर्व अद्यापनाचे कौशल्य आत्मसात करून देशसेवा करण्याचे वचन यावेळी अग्निवीर प्रशिक्षणार्थींनी देण्यात आले. तसेच राष्ट्रसेवेसाठी आपल्या मुलांना घडविणाऱ्या पालकांचेही यावेळी कौतुक करण्यात आले.

यावेळी वायुसेनेच्या अग्निवीर तुकडीचा दिमाखदार संचलन सोहळा पार पडला. अग्निवीर सैनिकांनी यावेळी उत्साहाने संचलन पार पाडले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्निवीर वायुसेनेच्या विवेक सिंग रावत यांना बेस्ट इन अकॅडमिक्स, नितीश यांना बेस्ट इन ग्राउंड सर्व्हिस ट्रेनिंगसाठी तसेच विवेक रावत यांना बेस्ट आलराउंडर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हवाई दलाच्या अग्निवीर तुकडीचा दीक्षांत समारंभ डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. यावेळी हवाई दलातील अग्निवीर तुकडीत रवाना झालेल्या सैनिकांच्या पालकांसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला.


Recent Comments