मागील वर्षी पावसाने मारलेल्या दडीमुळे नर्सरी व्यावसायिक अडचणीत आले आहेत. बेळगावमधील नर्सरीचालकांचे पावसाअभावी हाल होत असून रोपांची देखभाल करण्यासाठी टँकरद्वारे पाणी घेण्याची वेळ नर्सरी चालकांवर आली आहे.
पावसाअभावी कृषीविषयक असलेल्या सर्वच व्यावसायिकांना यंदा मोठा फटका बसला आहे. पाऊस नसल्याने जिल्ह्यातील नर्सरी चालकांचे मोठे नुकसान होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे पाऊस नसल्याने नर्सरी मधील रोपांची कोणीही खरेदी करत नाही तर दुसरीकडे रोपवाटिका जगवण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आल्याने नर्सरी चालक दुहेरी संकटात सापडले आहेत.
व्हॉइस : यासंदर्भात बेळगावमधील टिळकवाडी भागात असणाऱ्या नर्सरी चालकाशी इन न्यूजने संवाद साधला. यावेळी बोलताना नर्सरी चालकाने सांगितले कि गेल्या वर्षी पाऊस मुबलक न झाल्याने रोपवाटिका सुकत चालल्या आहेत. रोपांना जगवण्यासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. एरव्ही दोनवेळा करण्यात येणार पाणीपुरवठा आता एकच वेळ करण्यात येत असून यामुळे मोठे आर्थिक नुकसान झेलावे लागत आहे. यंदा पाऊस समाधानकारक झाला तरच आपला व्यवसाय तेजीत चालेल अन्यथा गुंतवणुकीसह नफ्याची रक्कमही टँकरच्याच पाण्यात खर्च होईल, असे नर्सरी चालकाने सांगितले.

याचप्रमाणे दिग्गेश कुमार या नर्सरी चालकाने सांगितले, कि आपल्याकडे विविध फळांची, फुलांची आणि सजावटीची शेकडो रोपे आहेत. पुण्याहून खरेदी करून बेळगावमध्ये विविध ठिकाणी रोपांची विक्री केली जाते. यांची देखभाल करण्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने रोपांची देखभाल करणे खर्चिक झाले असून पाऊस नसल्याने ग्राहकांनीदेखील रोप खरेदीकडे पाठ फिरविली आहे. यंदा पाऊस मुबलक होईल, अशी आशा आपल्याला आहे, असे मत दिग्गेश कुमार याने व्यक्त केले.
पाऊस नसल्याने नर्सरी व्यवसायिकांना चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे अनेक नर्सरी चालक आर्थिक अडचणीत आले आहेत. हवामानाच्या लहरीपणामुळे नर्सरी चालकांना रोपांची देखभाल करणे मुश्किल झाले असून यंदा तरी पाऊस समाधानकारक हजेरी लावेल अशी आशा नर्सरी चालकांनी ठेवली आहे.


Recent Comments