विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत विजयपूर जिल्ह्याला संधी मिळणार की नाही, यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यातील काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी आतापासूनच मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरू केले असून मुस्लिम, मागासवर्गीय आणि लिंगायत नेत्यांनाही सामावून घ्यावे, असा सूर काँग्रेसकडून उमटत आहे.
जून महिन्यात विधान परिषदेसाठी निवडणूक होणार आहे, 11 जागांसाठीच्या निवडणुकीसाठी आतापासूनच इच्छुकांचे लॉबिंग सुरु झाले असून विजयपूर जिल्ह्यात मुस्लिम, मागासवर्गीय आणि लिंगायत नेत्यांच्या मागण्या जोर धरू लागल्या आहेत. विजयपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने 6 जागा जिंकल्या आहेत. तसेच या जिल्ह्याला दोन्ही ज्येष्ठ मंत्री, दोन महामंडळाची पदे लाभली आहेत. यामध्ये संगमेश बबलेश्वर, डॉ.गंगाधर संबंन्नी, मल्लिकार्जुन लोणी आदी लिंगायत नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र विधान परिषदेसाठी मागासवर्गीय नेते सोमनाथ कळ्ळीमनी, मुस्लिम समाजाचे महंमदरफिक टपाल, एस.एम.पाटील गणीहार यांच्यासह अनेकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकला असल्याचे समजते. गेल्या ५० वर्षांपासून काँग्रेस पक्षाला मुस्लिम समाजाचा पाठिंबा असूनही मुस्लिम नेत्यांना उमेदवारीची संधी न दिल्याने नाराजी व्यक्त केली असून विधान परिषद निवडणुकीत मुस्लिम नेत्यांना संधी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याचबरोबर मागासवर्गीय समाजाच्या नेत्यांनाही उमेदवारी मिळविण्यासाठी दबावतंत्र सुरु असून भाजप जिल्हाध्यक्ष आर. एस. पाटील कुचबाळ, माजी मंत्री बेळ्ळब्बी यांच्याकडूनही विधानपरिषदेसाठी इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यात भाजपने एक आणि जेडीएसने एक अशा जागा मिळविल्या असून सर्वाधिक इच्छुक सत्ताधारी पक्षात असल्याचे दिसून येत आहे. इच्छुकांची आकडेवारी वाढल्याने काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसाठी ही बाब डोकेदुखी ठरली आहे. आपल्या नेत्यांना उमेदवारी मिळावी यासाठी पत्रकार परिषद आणि निवेदनाच्या माध्यमातून पक्षश्रेष्टींवर दबाव आणला जात आहे.
विजयपूर जिल्ह्याला दोन मंत्रीपदे आणि दोन महामंडळ पदे देणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेसाठी विजयपूरला संधी देण्यात येईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Recent Comments