Belagavi

शहापूर अळवण गल्लीत तणाव : क्रिकेटवरून दोन गटात हाणामारी

Share

 

गुरुवारी रात्री बेळगावमधी शहापूर येथील अळवण गल्लीत दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली. क्रिकेटवरून सुरु झालेल्या वादावादीचे हाणामारीत आणि त्यानंतर दगडफेकीत पर्यवसन झालेल्या प्रकारात १० जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेळगावमधील शहापूर अळवण गल्ली येथे गुरुवारी रात्री दोन गटात झालेल्या हाणामारी प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत एकूण 10 जणांना अटक करण्यात आली आहे.

गल्ली क्रिकेट खेळताना दोन गटातील तरुणांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर या वादात दोन्ही गटातील तरुणांच्या पालकांनीही हस्तक्षेप केला. दरम्यान वाद वाढत जाऊन घरांवर दगडफेक करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवत परिस्थिती पूर्वपदावर आणली. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून १० जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत 8 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणात सहभागी असलेल्यांना अटक करण्यात येत असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त लाडा मार्टिन मारबानियांग यांनी दिली.

या घटनेनंतर शहापूर भागात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तसेच खबरदारीसाठी अधिक पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे.

Tags: