Belagavi

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार : ॲडव्होकेट्स असोसिएशन फॉर ह्युमन राइट्स

Share

येत्या आठवड्याभरात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली जाईल असा इशारा ॲडव्होकेट्स असोसिएशन फॉर ह्युमन राइट्सने प्रशासनाला दिला आहे.

ॲडव्होकेट्स असोसिएशन फॉर ह्युमन राइट्सच्या वतीने आज बेळगावमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना असोसिएशनचे सदस्य ए डी नदाफ यांनी शहर आणि परिसरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाविषयी प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासंदर्भात जिल्हाप्रशासन, महानगरपालिका आणि पोलीस विभागाला निर्देश दिले आहेत. मात्र हे निर्देश पाळण्यात येत नसून बेळगावमध्ये भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढले असल्याचे दिसून येत आहे. बेळगावमध्ये गेल्या काही महिन्यात अनेक ठिकाणी झालेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अबालवृद्ध जखमी झाले आहेत.

बालकांवर जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटना इतक्या गंभीर आहेत कि यातील जखमी रुग्णांच्या नातेवाईकांना उपचारासाठी आर्थिक निधी उभा करणे कठीण बनले आहे. जिल्हा प्रशासन आणि मनपा तसेच पोलीस विभागाच्या दुर्लक्षपणामुळे शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या वाढली असून तातडीने याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी असोसिएशनचे सदस्य ए डी नदाफ यांनी केली.

असोसिएशनचे सदस्य एम एम जमादार बोलताना म्हणाले, शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना पाहता हे जिल्हा प्रशासनाचे अपयश म्हणावे लागेल. म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, स्टेट पोलीस ऍक्ट मध्ये भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासन योग्य पद्धतीने काम करत आहे कि नाही याची खातरजमा करणे हे जिल्हा प्रशासनाचे काम आहे. दर महिन्यात २०० हुन अधिक अशा घटना नोंद होत आहेत. १० ते १५ कुत्र्यांच्या समूहाने नागरिकांवर हल्ले होत आहेत.

भटकी कुत्री तसेच पाळीव कुत्री यासाठीही कायद्यात विशेष तरतुदी आहेत. मात्र या परिस्थितीकडे जिल्हा प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने बेळगावमध्ये अशा घटना वाढत आहेत. येत्या आठवडाभरात भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत पाऊले न उचलल्यास रिट याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा एम एम जमादार यांनी दिला.

या पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट्स असोसिएशन फॉर ह्युमन राइट्स चे सदस्य एम. एम. जमादार, एम. एस. कमलापूर, आय एम शहापुरी, डब्ल्यू एम. शाहूपुरी यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

Tags: