बेळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या मेट्रो कास्ट नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने २९ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे.
२९ वर्षांपूर्वी दिवंगत निशा छाब्रिया, नागेश छाब्रिया यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात करण्यात आलेल्या मेट्रो कास्ट नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने आज २९ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. कर्नाटकासह महाराष्ट्र, गोवा, पश्चिम बंगाल आदी ठिकाणी विस्तारलेल्या या कंपनीने ४० लाख ग्राहकांचे नेटवर्क जोडले आहे.
कर्नाटकात बेळगाव, विजयपूर, बागलकोट, रायचूर, बिदर, हुबळी – धारवाड, दावणगेरे, बेंगळुरू, म्हैसूर, चामराजनगर, हूनसुर, महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, नागपूर, सोलापूर, पंढरपूर, लातूर आदी भागासह पश्चिम बंगालमध्येही या नेटवर्कचे जाळे पसरले आहे.

ग्राहकांची आवडती मेट्रो कास्ट इंडिया नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने डिजिटल प्लॅटफॉर्मवर 700 हून अधिक HD गुणवत्तेचे चॅनेल उपलब्ध करून दिले आहेत. या संस्थेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास होण्यासाठी कर्मचारीही अमूल्य सेवा बजावत आहेत.
संस्थेच्या संचालिका निशा छाब्रिया यांच्या अकाली निधनामुळे संस्थेला काही दिवस अडचणींचा सामना करावा लागला होता. पण त्यांच्या प्रेरणेमुळे संस्था प्रगतीपथावर मार्गक्रमण करत आहे. कंपनीचे संस्थापक नागेश छाब्रिया आणि सुमुक छाब्रिया यांनी आगामी काळात ग्राहकांना आणखी 1000 चॅनल ऑफर करण्याचा मानस ठेवला आहे.
सुरुवातीला इन न्यूजचे संपादक राजशेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इन न्यूज वाहिनीवर हिंदी, मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेमध्ये बातम्या प्रसारित करण्यात येत होत्या. सध्या या वाहिनीवर कन्नड आणि मराठी भाषांमध्ये दैनंदिन बातम्या प्रसारित करण्यात येतात. या वाहिनीच्या माध्यमातून डॉ.आंबेडकर जयंती, राज्योत्सव, शिवजयंती, गणेशोत्सव आणि बेळगाव शहरासह विविध जिल्ह्यात, तालुक्यात घडणाऱ्या दैनंदिन बातम्यांचे थेट प्रक्षेपण लोकांपर्यंत पोहोचविण्यात येते. इन न्यूज वाहिनीने आता डिजिटल प्लॅटफॉर्मवरही प्रगती साधली आहे.

आज मेट्रो कास्ट इंडिया नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडच्या २९ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई कार्यालयात संस्थापक नागेश छाब्रिया आणि सुमुख छाब्रिया यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेला आजवर सहकार्य लाभलेल्या जाहिरातदारांचे, शुभचिंतकांचे आभार व्यक्त करत पुढील काळातही असेच सहकार्य मिळावे, अशी आशा व्यक्त करण्यात आली.


Recent Comments