बेळगावच्या शिवजयंती उत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. यंदाचे शिवजयंती साजरी करण्याचे १०६ वे वर्ष असून या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून बेळगावमध्ये पारंपरिक पद्धतीने शिवजयंतीसाजरी केली जात आहे.
पारंपरिकरीत्या आज बेळगावमध्ये शिवजयंती साजरी केली जात आहे. सकाळी विविध गड-किल्ल्यांवरून आणण्यात येणाऱ्या शिवज्योतींचे स्वागत धर्मवीर संभाजी चौक येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यानंतर नरगुंदकर भावे चौकातील मंडपात शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन व आरती करण्यात आली. नरगुंदकर भावे चौकातील शिवपूजन आटोपल्यानंतर छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले.

यावेळी बोलताना समिती नेते आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी बेळगावच्या शिवजयंती उत्सवाची पार्श्वभूमी सांगितली. तसेच शिवरायांच्या तत्वातून प्रेरणा घेऊन आजच्या तरुण पिढीने शिवरायांचे आदर्श अंगीकारणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर, शहर देवस्थान समितीचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, विकास कलघटगी, मदन बामणे, प्रकाश मरगाळे, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, महादेव पाटील, रमाकांत कोंडुसकर, रमेश पावले आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments