Belagavi

मृणाल हेब्बाळकर बेळगावकरांचा आवाज ठरतील : लक्ष्मी हेब्बाळकर

Share

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मृणाल हेब्बाळकर आणि काँग्रेसवर जनतेने दाखविलेला विश्वास आणि प्रेम पाहिल्यास मृणाल हेब्बाळकर २ लाख मतांच्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला.

बेळगाव ग्रामीण मतदार संघातील बीजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप, बेळवट्टी, बडस, बाकनूर, यळेबैल आदी भागात बुधवारी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी प्रचार केला. यावेळी बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, २०१३ पासून या भागातील जनतेशी माझे नाते जोडले गेले आहे. मी याच गावात जन्मले आणि वाढले. लोकसभा निवडणूक लढविणार उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचाही जन्म इथेच झाला. हि निवडणूक स्थानिक आणि बाहेरील उमेदवाराची आणि स्वाभिमानाची निवडणूक आहे. आपण स्थानिक उमेदवार म्हणून मतदार संघाच्या विकासाची अनेक स्वप्ने पाहिली असून हि स्वप्ने साकार करण्यासाठी मृणाल हेब्बाळकर यांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

निवडणुकीसाठी बाहेरून आलेले भाजपचे उमेदवार निवडणुकीनंतर येथून निघून जातील. त्यांना फक्त तुमचे मत हवे आहे, त्यांना बेळगावचा विकास नको आहे. त्यांचा सुरुवातीपासूनच बेळगावच्या विकासाला विरोध आहे, त्यामुळेच हुबळी – धारवाडच्या तुलनेत बेळगावचा विकास झालेला नाही. या विषमतेसाठी बेळगावातील जनता सातत्याने लढा देत आहे. पण इथल्या जनतेचे नेतृत्व करणारा खंबीर आवाज नव्हता. मृणाल हेब्बाळकर यांच्या माध्यमातून बेळगावकरांना खंबीर नेतृत्व लाभले असून त्यांच्या माध्यमातून बेळगावकरांचा आवाज लोकसभेत नक्कीच पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

बेळगाव लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, मी बेळगाव जिल्ह्यासाठी, येथील लोकांसाठी नक्कीच काम करणार आहे. बेळगावच्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मी सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करणार आहे. बेळगावचा सुसंघटित, सुंदर आणि शांततापूर्ण शहर म्हणून विकास करण्याचे माझे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी जनतेने मला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले

यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी या भागात आयोजिण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी यात्रोत्सवाच्या ठिकाणी जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतले व सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

यावेळी बीजगर्णी ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर, वसंत अष्टेकर, नामदेव मोरे, संदीप अष्टेकर, मारुती जाधव, श्रीरंग भास्कर, रवी जाधव, पाटील आदींसह अनेक मान्यवर, देवस्थान कमिटीचे पदाधिकारी आणि सदस्य तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Tags: