Belagavi

जयमृत्युंजय स्वामीजींनी टोचले मुरुगेश निराणी यांचे कान !

Share

महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पंचमसाली समाजाच्या आरक्षण लढ्याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जातीचा मुद्दा पुढे करून आपापसात भांडणे योग्य नाही, असे सांगत कुडल संगम पंचमसाली पीठाचे श्री जयमृत्युंजय स्वामीजी यांनी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री मुरुगेश निराणी यांचे कान टोचले आहेत.

बेळगावात बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना जयमृत्युंजय स्वामीजी म्हणाले की, मुरुगेशा निराणी यांचा पक्ष वेगळा असेलही कदाचित, पण जातीच्या नावाने मन दुखावेल असे कोणी बोलू नये. निराणी आणि हेब्बाळकर हे एकाच आईची मुले आहेत. असे राजकारण करणे योग्य नाही, जातीचा मुद्दा पुढे करून आपसात भांडणे योग्य नाही, असे त्यांनी निराणी यांना सुनावले.

लोकसभा निवडणुकीनंतर आरक्षण लढ्याची रूपरेषा तयार केली जाईल. आरक्षणाच्या लढ्याला प्रतिसाद न देणाऱ्यांचा धिक्कार करण्यासाठी आणि सहकार्य करणाऱ्यांना आशीर्वाद देण्यासाठी पंचमसाली समाजाला आवाहन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पंचमसाली समाजाला २ ए आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. मात्र आजपर्यंत आरक्षण न दिल्याने आम्ही नाराज आहोत, असे ते म्हणाले.

Tags: