बसवण कुडची येथे खास गुडीपाडव्यानिमित्त दरवर्षी प्रमाणे या वर्षीही तानाजी गल्ली, बसवण कुडची, येथील बाल शिवाजी लाठी मेळा या मंडळातर्फे शिवकालीन लाठी मेळा व मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
शिवकालीन लाठीमेळ्याची परंपरा गेल्या २५ वर्षांपासून जोपासणाऱ्या तानाजी गल्ली, बसवण कुडची, येथील बाल शिवाजी लाठी मेळा या मंडळातर्फे शिवकालीन लाठी मेळा व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. गावातील बसवण्णा मंदिर समोर हा कार्यक्रम झाला. त्यात सहभागी झालेल्यांनी लाठीमार, ढाल-तलवार, दांडपट्टा, तलवारबाजी तसेच करेला फिरवण्याची एकाहून एक थरारक प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. विशेष म्हणजे मुली व युवतींनीही युद्धकौशल्याची थरारक प्रात्यक्षिके दाखवून सर्वाना अवाक केले.
यासंदर्भात मंडळाचे अध्यक्ष जोतिबा मुतगेकर यांनी सांगितले की, बसवण कुडची येथे २५ वर्षांपूर्वी बालशिवाजी लाठीमेळ्याची स्थापना करण्यात आली असून, तेंव्हापासून अव्याहतपणे शिवकालीन पारंपरीक युद्धकला जपण्याचे कार्य आम्ही करत आहोत. आज ग्रामदेवतांच्या वार्षिक यात्रेनिमित्त प्रात्यक्षिकांचे आयोजन केले आहे. आमच्या लाठीमेळ्यात ६ वर्षांपासून ते ८५ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठांचा सहभाग असतो.

लाठीमेळ्याचे आणखी एक पदाधिकारी किसन कडेमनी यांनी लाठीमेळा विषयी सांगितले की, शिवकालीन युद्धकौशल्याची ही कला शिकल्याने शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते, त्याबरोबरच या प्राचीन कलेचे जतनही होते. स्वसंरक्षणासाठी या कला उपयुक्त आहेत, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, हलगीच्या तालावर सहभागी लाठीमारपटूंनी एकाहून एक युद्धकौशल्याची प्रात्यक्षिके दाखवून कुडची ग्रामस्थांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. ती पाहताना अंगावर रोमांच उभे रहात होते. बसवण्णा मंदिराच्या आवारात ही युद्धकौशल्याची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी आबालवृद्धांनी एकच गर्दी केली होती.


Recent Comments