महाराष्ट्र एकीकरण समितीने लोकसभा निवडणूक लढविण्याचे ठरविले असून, समितीचे एकनिष्ठ कार्यकर्ते महादेव पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीने लोकसभा निवडणूक लढविण्याचे ठरविल्यानंतर इच्छुक कार्यकर्त्यांकडून अर्ज मागवले होते. त्यानुसार चार कार्यकर्त्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी चंद्रकांत कोंडुसकर यांनी माघार घेतल्याने तीन नावांवर विचार करून महादेव पाटील यांना म. ए. समितीच्या निवड समितीने उमेदवारी जाहीर केली आहे.
बेळगाव शहर आणि तालुका म. ए. समितीची संयुक्त बैठक सोमवारी बेळगावात पार पडली. त्या बैठकीत महादेव पाटील यांना उमेदवारी दिल्याची घोषणा करण्यात आली. उमेदवारी जाहीर होताच समिती नेते व कार्यकर्त्यांनी महादेव पाटील यांना भगवा फेटा बांधून, पुष्पहार घालून सत्कार केला.
यावेळी बोलताना महादेव पाटील यांनी, आपल्याला उमेदवारी दिल्याबद्दल समिती नेत्यांचे आभार मानले. येत्या २१ तारखेला चिन्हे वाटप करण्यात येणार आहे. त्यावेळी आपल्याला जे चिन्ह मिळेल त्या चिन्हापुढील बटन दाबून लोकसभा निवडणुकीत आपल्याला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीला मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, राजाभाऊ पाटील, शहर कार्याध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, तालुका सरचिटणीस ऍड. एम. जी. पाटील, शुभम शेळके, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, ऍड. अमर येळ्ळूरकर, विकास कलघटगी, मदन बामणे, आर. एम. चौगुले, आर. आय. पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, राजू बिर्जे, सागर पाटील, राजू कणबरकर, प्रमोद पाटील, रामचंद्र मोदगेकर, श्रीकांत कदम आदी उपस्थित होते.


Recent Comments