Belagavi

अत्याधुनिक ज्ञान घेऊन फार्मासिस्ट्सनी स्वतःला अद्यावत ठेवावे : डॉ. मोंटूकुमार पटेल

Share

औषधनिर्माण शास्त्राचे कालानुरूप बदलणारे अत्याधुनिक ज्ञान संपादन करून फार्मासिस्ट्सनी स्वतःला अद्यावत ठेवण्याचे आवाहन फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. मोंटूकुमार पटेल यांनी केले.

बेळगावात शनिवारी केआरटीई संस्थेच्या राणी चन्नम्मा फार्मसी कॉलेजमध्ये अक्षयपात्र शिष्यवृत्ती योजनेचे अनावरण आणि माजी विध्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. डॉ. मोंटूकुमार पटेल पुढे म्हणाले की, फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना या क्षेत्रातील काळाला अनुरूप अत्याधुनिक अचूक व दर्जेदार शिक्षण मिळावे हा फार्मसी कौन्सिलचा हेतू आहे. त्यादृष्टीने विध्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचप्रमाणे भविष्यात फार्मसीचे विध्यार्थी आणि व्यावसायिक फार्मासिस्ट्स यांच्यासाठी अनेक चांगल्या योजना राबविण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी सदस्य डॉ. एफ. व्ही. मानवी यावेळी बोलताना म्हणाले की, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया अधिक मजबूत करण्याची गरज आहे. देशातील फार्मास्युटिकल्स क्षेत्राला नवी दिशा देण्याचे काम या संस्थेकडून झाले पाहिजे. भविष्यात संस्थेला आणखी चांगले दिवस येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राणी चन्नम्मा फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजयानंद पुजारी म्हणाले की, आर. एस. मदरखिंडी यांनी, उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवरील खेड्यापाड्यातील गोरगरीब, प्रतिभावंत विध्यार्थ्यांना फार्मसीचे शिक्षण सहज उपलब्ध व्हावे या हेतूने केआरई ट्रस्टची स्थापना करून त्या माध्यमातून राणी चन्नम्मा फार्मसी कॉलेज सुरु केले आहे.

आजवर ६२०० विध्यार्थ्यानी या कॉलेजमधून डी फार्मसी आणि बी. फार्मसीचे शिक्षण घेतले असून स्वतःचा व्यवसाय किंवा उच्च पदांवर काम करत आहेत. देशात प्रथमच ‘कमवा व शिका’ तत्वावर विध्यार्थ्यांसाठी अक्षयपात्र ही योजना कॉलेजने सुरु केली आहे. त्यात विध्यार्थ्यांना परतफेडीच्या अटीवर शिक्षणासाठी अर्थसाह्य केले जाईल, असे सांगून माजी विध्यार्थी मेळाव्यासाठी वेळेत वेळ काढून आलेल्या माजी विध्यार्थ्यांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केआरई ट्रस्टचे आर. एस. मदरखिंडी होते. त्यांनी तसेच फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी कार्यकारिणी सदस्य डॉ. एम. डी. कार्वेकर यांनी समयोचित भाषणे केली. यावेळी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे कार्यकारिणी सदस्य धर्मेंद्र सिंग, डॉ. एम. वेंकट रमणा, डॉ. नीलिमांका दास, डॉ. दीपेंद्र सिंग, कुमार अजय, सुशीलकुमार बन्सल, सुशील सुदान, गोपालकृष्ण शर्मा, के. राजाराम पांडियान, चन्नमा फार्मसी कॉलेजचे संचालक डॉ. ए. डी. तरनळ्ळी, बेळगाव जिल्हा रिटेल फार्मसी असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य, विविध ठिकाणांहून आलेले माजी विध्यार्थी, प्राध्यापक, विध्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

Tags: