Belagavi

बेळगावमध्ये उत्साहात आणि शांततेत पार पडला होळी सण

Share

रंगांचा सण होळी बेळगाव शहर आणि परिसरात उत्साहात आणि शांततेत पार पडला . रंगांची उधळण करीत , गाण्यांच्या तालावर थिरकत आबालवृद्धांनी होळीचा आनंद लुटला . आमदार अभय पाटील आयोजित होळी मिलन कार्यक्रकमला देखील महिला तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला .

बेळगाव शहर आणि परिसर होळीच्या रंगात रंगून गेले होते . सोमवारी सकाळी साधारण दहा वाजल्यापासून रंगाच्या उधळणीला सुरुवात झाली . तीव्र पाणीटंचाईमुळे यंदा पावडर कलरचा वापर करण्यावर भर दिसून आला . अबालवृद्ध , महिला , लहान मुले , तरुण तरुणी हा रंगाचा सण होळी बेधुंद होऊन साजरे करताना दिसून आले . एकमेकांना रंग लावून , होळी सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या . तरुण तरुणी वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे लावून , तोंडाला रुपेरी रंग फासून डीजेच्या तालावर नृत्य करीत होते . खडक गल्ली , चव्हाट गल्ली , अनगोळ आदी संवेदनशील भागात देखील होळी शांततेत साजरी करण्यात आली .

शहरातील पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिरासमोर दरवर्षीप्रमाणे लोटांगणाचा कार्यक्रम पार पडला . होळी सणाच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होऊन , भाविकांनी मंदिरासमोर लोटांगण घालून आपले नवस फेडले . यावेळी पांगुळ गल्लीत भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली .

त्याचप्रमाणे आ . अभय पाटील आयोजित “होळी मिलन ” या कार्यक्रमाला दरवर्षी प्रमाणेच अबालवृद्ध आणि तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला . शहरातील वॅक्सीन डेपो मैदानावर सकाळी साडेनऊ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली . आ . अभय पाटील यांनी सर्वप्रथम सर्वाना होळी सणाच्या शुभेच्छा दिल्या . काय्रक्रमाला सहकार्य दिल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले .

त्यानंतर उपस्थित महिला वर्गाने आ . अभय पाटील याना रंग लावून , त्यांनाही होळीच्या शुभेच्छा दिल्या . यानंतर सर्वानी स्प्रे कलर उडवून या होळी मिलन कार्यक्रमाचा शुभारंभ केला . डीजेच्या तालावर आणि पाण्याच्या फवाऱ्याखाली तरुण तरुणीचे ग्रुप अगदी बेधुंदपणे नृत्य करीत होते .  होळी मिलन कार्यक्रमानंतर आ . अभय पाटील आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रम स्थळी स्वच्छता मोहीम राबवली . वॅक्सीन डेपो मैदानावर या कार्यक्रमादरम्यान झालेला कचरा गोळा करण्यात आला .

एकंदर बेळगाव शहरात होळीचा सण उत्साहात आणि शांततेत पार पडला . शहरात शांतता आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाकडून शहरात काडादी पोलीस बंदोबस्त तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी ठेवण्यात आली होती . एकंदर कोणताही अनुचित प्रकार न घडता होळी सण शांततेत पार पडला .

Tags: