अवैध धंद्यांना चाप बसवून बेळगाव शहरात बेळगावात कायदा व सुव्यवस्था मजबूत करणार आहे. त्यासाठी समाजातील सर्व घटकांचे सहकार्य हवे आहे, अशी अपेक्षा नूतन पोलीस आयुक्त इयाडा मार्टिन मार्बीनांग यांनी व्यक्त केली.
नूतन पोलीस आयुक्त इयाडा मार्टिन मार्बीनांग यांनी काल सोमवारी सायंकाळी पदाची सूत्रे स्वीकारून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, काल सायंकाळी पदाची सूत्रे स्वीकारून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली. त्यात त्यांना काही महत्वाच्या सूचनाही केल्या आहेत. गुन्हेगारी, वाहतुकीचे प्रश्न आणि कायदा व सुव्यवस्थेविषयी माहिती घेतली आहे. शहरातील काही मान्यवर, संघ-संस्थाकडूनही माहिती घेणार आहे. समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी ऍक्शन प्लॅन बनवणार आहे. बेळगावला एक निर्धोक शहर बनवायचा विचार आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था मजबूत करणार असून त्यासाठी समाजातील सर्वच घटकांचे सहकार्य हवे आहे, असे त्यांनी सांगितले.
बेळगाव शहरात वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी चांगले काम केले आहे. तरीही अनेक ठिकाणी डबल पार्किंग, वाहतूक कोंडी अशा समस्या आहेत. त्या सोडविण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. शहरात अमली पदार्थांच्या विक्रीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. शहराला, युवापिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून सोडविण्यासाठी कंबर कसण्यात येईल. शहरातील अनेक रिक्षाचालक मनमानी भाडे आकारतात, याकडे लक्ष वेधले असता, याबाबत जिल्हास्तरीय समितीकडून कारवाईचे आदेश आले पाहिजेत. या समितीशी चर्चा करून याला आळा घालण्यात येईल, असे ते म्हणाले. गुन्हेगारी, अमली पदार्थ विक्री प्रकरणे आदींचा तपास कुठल्या टप्प्यात आहे ते तपासून गती देण्यात येईल. एकंदरीत गुन्हेगारीला आळा घालून कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्याला आपले प्राधान्य राहणार आहे, असे नूतन पोलीस आयुक्त इयाडा मार्टिन मार्बीनांग यांनी सांगितले.
एकंदर, नव्या पोलीस आयुक्तांनी बेळगाव शहर गुन्हेगारीमुक्त करण्याचा मनोदय व्यक्त केलाय. यासाठी आता त्यांच्या अपेक्षेनुसार जनतेनेही सहकार्य करण्याची गरज आहे.


Recent Comments