Belagavi

खासबाग टीचर्स कॉलनीतील विहिरीचे होणार पुनरुज्जीवन

Share

प्यास फाउंडेशन आणि एकेपी फेरोकास्ट्सकडून खासबाग येथील शतकानुशतके जुन्या विहीरीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या कामाचे आ. अभय पाटील यांच्याहस्ते कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले.

बेळगावातील समाजसेवी संस्था प्यास फाऊंडेशनने एकेपी फेरोकास्ट्सच्या सीएसआर निधीतून टीचर्स कॉलनी, खासबाग येथील जुन्या दुर्बल विहिरीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. या विहिरीची बऱ्याच दिवसांपासून दुरवस्था झाली होती. त्यामुळे स्थानिक नगरसेविका सौ. प्रीती खामकर यांनी प्रभागातील नागरिकांसह प्यास फाऊंडेशन यांना विहिरीचे पुनरुज्जीवन करण्याची विनंती केली. त्याला प्यास फाऊंडेशनने होकार दर्शवला आहे.

आता विहिरीचे गाळ काढून भिंती आणि पॅरापेट मजबूत करून त्याला स्थिर स्वरूप देण्यात येणार आहे. आज, रविवारी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, नगरसेविका सौ. प्रीती खामकर, एकेपी फेरोकास्ट्सचे संचालक पराग भंडारे, प्यास फाऊंडेशनचे बोर्ड सदस्य विनायक खामकर आणि खासबागमधील अनेक नागरिकांच्या हस्ते पूजन करून या कामाची सुरुवात करण्यात आली. यावेळी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर व टीचर्स कॉलनीतील रहिवासी उपस्थित होते.


प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विहिरीला महापालिकेकडून फिल्टर युनिट बसवले जाईल, जेणेकरुन टीचर्स कॉलनी वसाहतीसह खासबागमधील भागातील पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघेल. 1916 मध्ये ब्रिटीश काळात बांधलेली विहीर दुर्लक्षित झाल्यामुळे तिचे आकर्षण गमावून बसली होती. परंतु आता तिला चांगले दिवस येणार आहेत.

Tags: