Belagavi

बेळगावात प्रथमच 3,64,500 रुपये किंमतीचे क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन जप्त

Share

भांदूर गल्ली, नाथ पै चौक, अनगोळ येथे अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या ड्रग पेडलरला अटक करून त्याच्याकडील 3,64,500 रुपये किंमतीचे मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात बेळगाव पोलिसांना यश आले आहे. क्रिस्टल स्वरूपातील मेथॅम्फेटामाइन जप्त करण्याची बेळगावातील ही पहिलीच वेळ आहे.

बेळगावातील टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांदूर गल्ली, नाथ पै चौक, अनगोळ येथे तलावाजवळील सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीरपणे अमली पदार्थांची विक्री होत असल्याची पक्की खबर टिळकवाडी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांची सापळा रचून भांदूर गल्ली, नाथ पै चौक, अनगोळ येथे छापा टाकला.

या छाप्यात एकाला अटक करून त्याच्याकडील 39.450 ग्रॅम वजनाचे मेथॅम्फेटामाइन नावाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 3,64,500 रुपये आहे.

पोलीस आयुक्त, उपायुक्त व खडेबाजार उपविभागाचे एसीपी शेखरप्पा एच यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडी पोलीस ठाण्याचे सीपीआय कपिलदेव, हेड कॉन्स्टेबल महेश पाटील, ए. व्ही. नीलप्पनवर, नवीनकुमार जी, मल्लिकार्जुन पात्रोट व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला. दरम्यान, पोलीस आयुक्त व उपायुक्तांनी या कामगिरीबद्दल टिळकवाडी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

Tags: