Belagavi

भाषिक तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवून शुभम शेळके यांना अटक

Share

कन्नड संघटनांच्या दबावाखाली येणाऱ्या करनाटकी पोलिसांचा मराठी द्वेष पुन्हा एकदा उफाळला आहे. बेळगावच्या माळमारुती पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांना भाषिक तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवून अटक केली आहे.

बेळगावात नुकत्याच आयोजित केलेल्या आनंदवाडी कुस्ती आखाड्यात नेपाळी मल्लाने जय महाराष्ट्र म्हटल्यानंतर त्याला एका व्यावसायिकाने आक्षेप घेतला होता. त्यानंतर शुभम शेळके व सहकाऱ्यांनी त्या उद्योजकाच्या शिनोळी येथील फॅक्टरीकडे जाऊन फॅक्टरीच्या प्रवेशद्वारावर ‘जय महाराष्ट्र’ असे लिहून उद्योजकाच्या फोटोला काळे फासले होते. शुभम शेळके यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते व शिवसैनिकांनी उद्योजक श्रीकांत देसाई यांचा निषेध केला होता. यासंदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

त्यामुळे सोमवारपासूनच पोलिसांनी शेळके यांना फोन करून स्थानकात बोलावण्यास सुरु केले होते. काही कारणाने त्यांना सोमवारी पोलीस ठाण्यात जाता आले नव्हते. मंगळवारी सकाळी ते पोलीस स्थानकात गेले. त्यावेळी शुभम शेळके यांनी आपल्याला का बोलावले आहे? आपल्याविरोधात कोणी तक्रार दिली आहे?, असे विचारले. त्यावर पोलिसांनी, साहेब यायचे आहेत, थांबा असे सांगितले. त्यावर शुभम शेळके यांनी आपल्याला एका खटल्याच्या सुनावणीसाठी कोर्टात जायचे आहे, असे सांगून ते न्यायालयात आले.

त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी त्यांना न्यायालयातूनच ताब्यात घेतले. नंतर बीम्स हॉस्पिटलमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पोलीस आयुक्तालयात नेण्यात आले. यावेळी मराठी भाषिक तरुण व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. त्यांनी शुभम यांना का अटक केली असे विचारले असता, पोलिसांनी थातुरमातुर उत्तरे दिली. नंतर माळमारुती पोलिसांनी शुभम शेळके यांना अटक करून भाषिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 110 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या संदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना डीसीपी रोहन जगदीश यांनी सांगितले की, शुभम शेळके यांच्या संदर्भात आम्हाला काही माहिती मिळाली होती. टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या कुस्ती आखाड्यात एका नेपाळी मल्लाने दिलेल्या घोषणेला एका उद्योजकाने आक्षेप घेतल्यावरून उद्योजक आणि शुभम शेळके यांच्यात वादावादी झाली होती. त्यानंतर शुभम शेळके यांनी उद्योजकाच्या महाराष्ट्रातील शिनोळीतील फॅक्टरीच्या प्रवेशद्वारावर काळी फासले होते.

त्याचा व्हीडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल केला होता. भाषिकदृष्ट्या बेळगाव संवेदनशील असल्याने त्याचे पडसाद उमटून बेळगावात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने शुभम शेळके यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर बेळगावातील पोलीस स्थानकात ५ गुन्हे दाखल आहेत, असे ते म्हणाले. शेळके यांच्यावर गुंडा कायद्यान्वये कारवाई करणार का? या प्रश्नावर डीसीपी रिजन जगदीश म्हणाले की, याबाबत अनेक नियम व गुंतागुंत आहे. भविष्यात तशी कृत्ये घडल्यास, नियमांचा अभ्यास करून कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रातील शिनोळीतील घटनेत शुभम शेळके व सहकाऱ्यांनी लोकशाही मार्गाने निषेध नोंदवला होता. त्याचा बेळगावातील कन्नड संघटनांनी विनाकारण बाऊ केला असून, त्यांच्या दबावाखाली येऊन करनाटकी पोलिसांनी बेळगावात शेळके यांच्यावर आकसाने कारवाई करणे कितपत संयुक्तिक आहे असा प्रश्न मराठी भाषिकातून विचारण्यात येत आहे.

Tags: