हुक्केरी तालुक्यातील हिडकल जलाशयाच्या बॅकवॉटरमध्ये जमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांनी दुसऱ्या दिवशीही बेळगाव पाटबंधारे कार्यालयासमोर मुक्काम ठोकून आंदोलन सुरूच ठेवले. आवारात जनावरे बांधल्याने कार्यालयाला गोठ्याचे स्वरूप आले आहे.
हुक्केरी तालुक्यातील मास्तीहोळी, गुडनट्टी आणि बिरहोळी गावातील शेकडो शेतकरी आपल्या कुटुंबियांसह काल, सोमवारपासून बेळगावातील क्लब रोडवरील पाटबंधारे खात्याच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आहेत. त्यांनी सोबत आणलेले बैल कार्यालयाच्या आवारात बांधल्याने पाटबंधारे कार्यालयाला एखाद्या गोठ्याचे स्वरूप आले आहे. जनावरांना तेथेच बांधून चारा घालण्यात येत आहे. आंदोलनात छोट्या मुली व महिलांची संख्या लक्षणीय आहे. मात्र त्यांना स्वच्छतागृहाची सोय नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे.
या आंदोलनाबाबत बोलताना इरव्वा यरगार या महिलेने सांगितले की, काल सोमवारी सकाळपासून आम्ही येथे आंदोलन करत आहोत. आम्हाला झोपायला जागा नाही. तसेच शौचालयाची सोय नाही. बाहेर गेल्यावर पोलीस कुठे चाललात म्हणून दरडावत आहेत. पाटबंधारे अधिकाऱ्यांनी भरपाई न देता आम्हा शेतकऱ्यांचा अतोनात छळ चालवला आहे. आम्हाला भरपाई मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही येथेच विष पिऊन जीव देऊ, मात्र भरपाई मिळेपर्यंत मागे हटणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

आणखी एक महिलेने सांगितले की, आम्ही जवळपास 30-40 वर्षांपासून आंदोलन करत आहोत, पण आम्हाला न्याय मिळालेला नाही. म्हणून आम्ही कालपासून बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. मात्र कोणीही अधिकारी आमच्याकडे आला नाही, आम्हा आंदोलकांच्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला अधिकारीच जबाबदार असतील. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना आमची पर्वा नाही, त्यांनी आमच्या संपादित केलेल्या जमिनीची भरपाई दिली नाही तर आम्ही आंदोलन सुरूच ठेवू.
आंदोलकांचे नेते बाळेश मावनूर म्हणाले की, जमीन गमावलेले सर्व शेतकरी कुटुंब व बैलांसह बेमुदत उपोषणाला बसले आहेत. कालपासून अधिकाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. शेतकरी येतात, आंदोलन करतात आणि जातात अशी त्यांची धारणा असेल तर ती चुकीची आहे. भरपाईसाठी आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
एकंदर, हिडकल धरणात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना 44 वर्षांनंतरही भरपाई मिळालेली नसल्याने त्यांनी अखेर ‘करो या मरो’ म्हणत आरपारची लढाई सूरु केली आहे. मायबाप सरकार त्यांच्या न्यायासाठीच्या या लढ्याची दखल घेणार की नाही हे पहावे लागेल.


Recent Comments