बेळगावात नुकत्याच झालेल्या आनंदवाडी कुस्ती आखाड्यात नेपाळी मल्लाला ‘जय शिवाजी’, ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यापासून रोखणारे उद्योजक श्रीकांत देसाई यांच्या महाराष्ट्रातील शिनोळी येथील फॅक्टरीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते व शिवसैनिकांनी धडक मारून त्यांच्या फलकाला काळे फासले.
आनंदवाडी कुस्ती आखाड्यात नेपाळचा यु ट्युबर मल्ल देवा थापा याची मनोरंजनात्मक कुस्ती झाली. त्यासाठी आखाड्यात उतरताच त्याने, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्या. त्यावेळी उद्योजक श्रीकांत देसाई यांनी थापाच्या हातातील माईक हिसकावून घेत, आपण कर्नाटकात राहतो, जय महाराष्ट्र म्हणू नकोस असे सांगितले. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दत्ता जाधव, आर. एम. चौगुले, सागर पाटील व गजानन पवार यांनी उद्योजक श्रीकांत देसाई यांना कडक जाब विचारला होता.
दरम्यान, देसाई यांच्या कृतीचे संतप्त पडसाद सीमाभागात उमटत आहेत. त्याशिवाय आज महाराष्ट्रातील शिनोळी येथेही याचे पडसाद उमटले. देसाई यांच्या शिनोळी येथील फॅक्टरीवर महाराष्ट्र प्रेमींनी धडक दिली आणि त्यांना चांगलाच इशारा दिला. फॅक्टरीसमोरील देसाई यांच्या फलकावर गद्दार असे लिहून त्यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले. तसेच मुख्य प्रवेशद्वारावर जय महाराष्ट्र असे लिहिण्यात आले.
यावेळी बोलताना युवा समिती नेते शुभम शेळके यांनी, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर महाराष्ट्राचा सन्मान राखवाच लागेल अन्यथा तुमची धाबडी बंद करू, असा इशारा दिला.
यावेळी युवा समिती नेते शुभम शेळके, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, सूरज कणबरकर, मनोहर हुंदरे, रवी निर्मळकर, प्रवीण रेडेकर, सचिन दळवी, मल्लापा पाटील, किरण मोदगेकर, राजू पाटील, मोतेश बारदेशकर, युवा सेना चंदगडचे विक्रम मुतकेकर, युवा सेना बेळगावचे विनायक हुलजी, मल्हारी पावशे, अद्वेत चव्हाण-पाटील, सोमनाथ सावंत, विक्रम मुतकेकर, महेंद्र जाधव यांच्या सह म.ए. समिती, आणि युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments