Belagavi

बेळगावात रोटरी-मारवाडी युवा मंचातर्फे प्रथमच अनोखा साडी वाकेथॉन

Share

साड्या घालून झपाझप चालणाऱ्या महिला, कोणी पदर सांभाळत चालतंय तर कोणी आपल्या पाल्याला पोटाशी बांधून चालतंय असे दृश्य आज बेळगावात पहायला मिळाले. निमित्त होते रोटरी क्लब इलाईट आणि मारवाडी युवा मंच आयोजित ‘साडी वाकेथॉन’चे !

होय, बेळगावातील हिंदवाडी परिसरात आज, रविवारी सकाळी एक अनोखे दृश्य पहायला मिळाले. बेळगावच्या इतिहासात प्रथमच रोटरी क्लब ऑफ बेलगाम इलाईट आणि मारवाडी युवा मंच ‘पंख’ आयोजित ‘साडी वाकेथॉन’मध्ये सर्व वयोगटातील महिलांनी एकाहून एक सुंदर साड्या नेसून शानदार पदयात्रा पार पाडली. भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या साडी नेसण्याच्या परंपरेला पुन्हा एकदा उजाळा देऊन प्रोत्साहन देण्याच्या हेतूने या उपक्रमाचे आयोजन केले होते.

हिंदवाडीतील गोमटेश विध्यापीठापासून रविवारी सकाळी ‘साडी वाकेथॉन’ला प्रारंभ करण्यात आला. तेथून नवहिंद सोसायटी मुख्यालयापर्यंत व तेथून फिरून आरपीडी क्रॉसवरून गोमटेश विध्यापीठापर्यंत अशा 3 किमी अंतराच्या या साडी वाकेथॉनमध्ये तरुणींपासून ते आजीबाईपर्यंत सर्वच वयोगटातील सुमारे 500 महिलांनी सळसळत्या उत्साहाने जल्लोषात भाग घेतला. आयोजकांतर्फे देण्यात आलेल्या टोप्या घालून हसत-खिदळत भराभर चालताना महिलांचा आनंद ओसंडून वहात होता.

रोटरी क्लब ऑफ बेलगाम इलाईट आणि मारवाडी युवा मंचचा महिला विभाग ‘पंख’ यांनी, रोट्रॅक्ट क्लब ऑफ केएलई टेक बेलगाम इलाईटच्या सहकार्याने या ‘साडी वाकेथॉन’चे आयोजन केले होते. हा उपक्रम ग्लॅमर मफतलाल, रिलायन्स ट्रेंड्स, कैलाश प्रभात, हजारे किचनवेअर, बालाजी वेफर्स, गौरी सिल्क, ऍक्वॉ, ‘बेला’ महिला संघटना आदींनी पुरस्कृत केला होता.

या उपक्रमासंदर्भात इन न्यूजला माहिती देताना मारवाडी युवा मंचचा महिला विभाग ‘पंख’च्या अध्यक्षा मनीषा उपाध्याय यांनी सांगितले की, आजकाल पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली येऊन भारतीय महिलांची सांस्कृतिक ओळख असलेली साडी नेसण्याची प्रथा लोप पावत चालली आहे. तिला पुन्हा उजाळा देण्यासाठी आणि साडी परिधान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही ‘साडी वाकेथॉन’चे आयोजन केले आहे. 3 किमी अंतराच्या या साडी वाकेथॉनमध्ये तरुणींपासून ते आजीबाईपर्यंत सर्वच वयोगटातील सुमारे 500 महिलांनी सळसळत्या उत्साहाने जल्लोषात भाग घेतला.विशेष म्हणजे 70 वर्षांवरील आजीबाईंनीही यात उत्साहाने भाग घेतला आहे.

कार्यक्रमाचे संयोजक हेमेंद्र पोरवाल यांनी सांगितले की, भारतीय महिला साडीमध्ये खूप सुंदर दिसतात. पण आजकाल साडी नेसण्याची परंपरा लोप पावतेय. तिचे जतन करण्यासाठी महिलांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशानं मारवाडी युवा मंच पंख आणि रोटरी क्लब ऑफ बेलगाम इलाईट यांनी विविध पुरस्कर्त्यांच्या मदतीने हा उपक्रम राबवला आहे. महिलांनी त्यात उत्साहाने भाग घेऊन तो यशस्वी केला आहे. हा उपक्रम प्रायोजित करणारे पुरस्कर्ते, रोटरी व मारवाडी युवा मंच पंखचे सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. त्यांचे मी आभार मानतो.

सहभागी झालेल्या महिलांनीही इन न्यूजशी बोलताना साडी वाकेथॉनमध्ये सहभाग घेण्याचा आपला अनुभव अतिशय आनंद देणारा ठरल्याचे सांगितले. ही एक चांगली संकल्पना आहे. साडी नेसल्याने चालणे कठीण वगैरे काही नसते, ती आपली मानसिकता असते हे आज सिद्ध झाले. महिलांनी साडी नेसण्याच्या प्राधान्य देऊन भारतीय पोषाखाची परंपरा जपावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी रोटरी क्लब ऑफ बेलगाम इलाईटचे अध्यक्ष जयकुमार पाटील, सचिव आदर्श मत्तिकोप्प, इव्हेन्ट चेअरमन प्रशांत हिरेमठ, मारवाडी युवा मंच पंखच्या अध्यक्षा मनीषा उपाध्याय, सचिव पूर्णिमा ओझा, इव्हेन्ट चेअरमन सरस्वती बजाज यांच्यासह रोटरी क्लब, मारवाडी युवा मंचचे पदाधिकारी, सदस्य आदी उपस्थित होते.

Tags: