सीमाभागातील कन्नडसक्तीची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देऊन गांभीर्यपूर्वक चर्चा करतो. सीमालढ्याच्या वकिलांशीही मी बोलतो लवकरच यातून मार्ग काढू असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगलेच्या दौऱ्यावर आलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने हातकणंगले येथे भेट घेतली. यावेळी शिंदे यांच्याशी बोलताना समिती नेत्यांनी कर्नाटक सरकारकडून सीमाभागात सुरु असलेल्या कन्नडसक्तीची माहिती दिली. महाराष्ट्रातून यावर काहीच प्रतिक्रिया न आल्यामुळे कर्नाटक सरकार कन्नड सक्तीच्या नावाने अतिरेक करत आहे.
फक्त व्यवसायिकांनाच नाही तर युवक मंडळांचे सूचना फलक सुद्धा काढले जात आहेत. ‘जय महाराष्ट्र’ बोलायला सुद्धा मज्जाव केला जातोय, असे सांगून सीमाभागातल्या भयानक परिस्थितीची माहिती दिली. शिष्टमंडळाची कैफियत ऐकून मुख्यमंत्री शिंदे यांनी, मी आजच दिल्लीला चाललोय, केंद्रीय गृहमंत्र्यांशी यावर गांभीर्यपूर्वक चर्चा करतो. सीमालढ्याच्या वकिलांशीही मी बोलतो लवकरच यातून मार्ग काढू असे आश्वासन दिले.
यावेळी बेळगाव वरून म.ए.समिती युवा नेते शुभम शेळके, भागोजीराव पाटील, किरण मोदगेकर, मनोहर हुंदरे, प्रवीण रेडेकर, सचिन दळवी निपाणी वरून डॉ. अच्युत माने, निपाणी समितीचे अध्यक्ष जयराम मिरजकर, युवा समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, सुनील किरळे, रमेश कुंभार, गणेश माळी आदी उपस्थित होते.


Recent Comments