Belagavi

बेळगावात योगी बिरादार यांच्या पेंटिंग्ज, फोटोंचे प्रदर्शन सुरु

Share

बेळगावातील नामवंत चित्रकार व फोटोग्राफर वाय, जी. तथा योगी बिरादार यांनी काढलेल्या पेंटिंग्ज आणि फोटोंच्या प्रदर्शनाचे उदघाटन आज टिळकवाडीतील वरेरकर नाट्यसंघाच्या कलामहर्षी के. बी. कुलकर्णी कला दालनात करण्यात आले.

बेळगावातील नामवंत चित्रकार व फोटोग्राफर वाय, जी. तथा योगी बिरादार आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रकला आणि छायाचित्रण शैलीमुळे ओळखले जातात. त्यांनी निसर्गातील विविध दृश्यांची, प्रसंगांची चित्रे हुबेहूब, सुबक रेखाटली असून, तितक्याच प्रभावीपणे छायाचित्रणही केले आहे. त्यांनी काढलेल्या अशा पेंटिंग्जचे आणि छायाचित्रांचे प्रदर्शन टिळकवाडीतील दुसऱ्या रेल्वेगेटजवळील वरेरकर नाट्यसंघाच्या कलामहर्षी के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीत भरविण्यात आले आहे. आज, गुरुवारी सकाळी या प्रदर्शनाचे उदघाटन प्रख्यात अभिनेते प्रसाद पंडित, लेखक निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे, क्रेडाई अध्यक्ष दीपक गोजगेकर आदींच्याहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

या प्रदर्शनात योगी बिरादार यांनी रेखाटलेली निसर्गचित्रे, सामान्य जीवनातील व्यक्तींची चित्रे तसेच त्यांनी काढलेल्या छायाचित्रांची मांडणी करण्यात आली आहे. एकाहून एक सुबक, हुबेहूब चित्रे आणि फोटो पाहताना देहभान हरखून जायला होते.


या संदर्भात इन न्यूजशी बोलताना प्रख्यात अभिनेते प्रसाद पंडित म्हणाले की, योगी बिरादार यांनी रेखाटलेली पेंटिंग्ज आणि काढलेले फोटो अप्रतिम असून, त्यात अनोखा भावाविष्कार आढळतो. खरोखर ती चित्रे आहेत की फोटो असा प्रश्न पडावा इतकी ती सुरेख, वास्तवदर्शी आहेत. बेळगावकरांनी आवर्जून या प्रदर्शनाला भेट देऊन, आपल्याला पसंत पडतील ती पेंटिंग्ज व फोटो खरेदी करून घरी घेऊन जावीत असे आवाहन त्यांनी केले.


वरेरकर नाट्यसंघात भरविले योगी बिरादार यांच्या पेंटिंग्ज आणि फोटोंचे हे प्रदर्शन आजपासून 13 मार्चपर्यंत रोज सकाळी 11 ते सायंकाळी 7.30 या वेळेत पाहण्यासाठी खुले आहे.

Tags: