महाशिवरात्रीनिमित्त बेळगावातील केएलई संस्थेच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या आवारातील शिवालयात भगवान शंकराची विशेष रूद्राभिषेक, होम हवन व महामंडळ पूजा बांधण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्त आज पहाटेपासून शिवभक्तांनी शिवालयात येऊन बिल्वपत्र, तुळशी, फुले, फळे, नैवेद्य अर्पण केला.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील महाशिवरात्री निमित्त बेळगाव येथील केएलई विद्यापीठाच्या आवारातील शिवालयात भगवान शंकराची खास रुद्राभिषेक पूजा करण्यात आली. यावेळी भक्तांनी शिवलिंगासमोर नतमस्तक होऊन शिवनामाचा जप केला. यावेळी शिवालयाचे मुख्य पुजारी वेदब्रह्म शंकरय्या शास्त्री यांनी इन न्यूजशी बोलताना सांगितले की, आजच्या दिवशी महाशिवरात्री आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे, त्यामुळे सर्व महिलांचे कल्याण व्हावं या भावनेने प्रत्येकाने शिवाजवळ प्रार्थना केली. शिवरात्रीनिमित्त या शिवालयात आज अर्धनारीश्वर शिवलिंग, अमरनाथ हिमलिंगाची प्रतिकृती उभारून पूजा केली आहे.

पहाटे ४ वाजल्यापासूनच अनेक भाविकांनी शिवालयात येऊन पूजा केली. केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे आणि संचालकांनीही येथे येऊन दर्शन घेतले. संध्याकाळी विशेष भजनाचे कार्यक्रम झाले, संध्याकाळी केळी, साबुदाणा खिचडी, खजूर आणि गंगाजल प्रसाद वितरित करण्यात आला, असे ते म्हणाले.
सावंतवाडी येथील युवती आर्या आनंद कासार हिने सांगितलं की, मी 12 वर्षांची असल्यापासून शिवरात्रीचा उपवास करते. यंदाही काल रात्रीपासून शिवनामाचा जप करून उपवास केला आहे. आज शिवालयात शिवाचे दर्शन घेण्यासाठी आले आहे. यावेळी अनेक भाविकांनी शिवालयात विशेष महापूजेसाठी येऊन शिवनामाचा जप केला.


Recent Comments