Belagavi

जालगार गल्ली शादीमहलच्या कामाला आ. राजू सेठ यांच्याहस्ते चालना

Share

बेळगावातील जालगार गल्लीतील शादीमहलच्या कामाला बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांच्याहस्ते चालना देण्यात आली. गोरगरिबांनी या समुदाय भवनाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

बेळगावातील जालगार गल्लीतील शादीमहलच्या कामासाठी माजी आमदार फिरोज सेठ यांनी पाठपुरावा करून अनुदान मंजूर करून घेतले होते. त्यातून पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. मात्र नंतर सरकार बदलल्याने काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम थांबले होते. आता आमदार राजू सेठ यांच्या प्रयत्नाने अल्पसंख्यांक कल्याण विभागाने या शादीमहलसाठी अनुदान मंजूर केले आहे. त्यातून अब्दल शादीमहलचे काम सुरु करण्यात येत असून या कामाला आमदार राजू सेठ यांच्याहस्ते चालना देण्यात आली.

यावेळी बोलताना आमदार राजू सेठ म्हणाले की, जालगार गल्ली परिसरात गरीब व मध्यमवर्गीय लोकांची संख्या भरपूर आहे. त्यांना लग्न व अन्य सोहळ्यासाठी महागडी कार्यालये परवडत नाहीत. त्यामुळे सरकारी अनुदानातून अब्दल शादीमहलची उभारणी करण्यात येत आहे. लवकरच हे काम पूर्ण करण्यात येईल. त्याचा गरीब व मध्यमवर्गीयांनी सदुपयोग करून घ्यावा. यासाठी अनुदान मंजूर केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांचे आभार मानले.

यावेळी बोलताना माजी आमदार फिरोज सेठ म्हणाले की, या भागातील लोकांची शादीमहल उभारण्याची अनेक दिवसांची मागणी होती. त्यामुळे अब्दल शादीमहलसाठी मी आमदार असताना निधी मंजूर करून घेतला होता. मध्यंतरी काही अडचणीमुळे हे काम ठप्प झाले होते. त्याला आता पुन्हा चालना मिळाली आहे. लवकरच हे काम पूर्ण होऊन समाजाला त्याचा उपयोग होईल असे सांगून त्यांनी मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांचे आभार मानले.

यावेळी नगरसेवक मुजम्मिल डोणी, अफजलबेग टीनवाले, सईदखान तासगावकर, अशपाक आगा तसेच जमातचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Tags: