Vijayapura

विजयपूरच्या शिवगिरी येथे महाशिवरात्रीची जोरदार तयारी

Share

ध्यानस्थ मुद्रेतील ईश्वर, शिवापुढे गुडघे टेकलेला नंदी, शिळेच्या रंगातला दिसायला सुंदर, प्रसन्नवदन महेश्वर. विशेषत: महाशिवरात्रीच्या उत्सवात या शिवासमोर उभे राहून ओम नमः शिवाय चा जप करण्याचे पुण्य लाभावे इतके लोभस वातावरण. येत्या शिवरात्रीची जोरदार तयारी येथे करण्यात आली आहे. पहा हा वृत्तांत.

विजयपूर शहराच्या सीमेवर असलेले शिवगिरी क्षेत्र महाशिवरात्रोत्सवासाठी सज्ज झाले आहे. याठिकाणी स्थापित केलेल्या 85 फूट उंचीच्या शंकराच्या भव्य मूर्तीचे विविध जिल्ह्यातील भाविक भक्तिभावाने दर्शन घेतात. शिवगिरीचे प्रभारी असलेल्या टी. के. पाटील चॅरिटेबल ट्रस्टने यंदाचा उत्सव धार्मिक उत्साहात, भक्तिभावाने साजरा करण्यासाठी आणि सांस्कृतिक मेजवानीसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

अठराव्या शिवरात्रीचा एक भाग म्हणून पहाटे ५ वाजता रुद्राभिषेक, भस्मार्चन, बिल्वार्चन, पुष्पार्चन, पंच कळसार्चन यानंतर दर तासाला काशीविश्वनाथाची पूजा केली जाईल. ती अहोरात्र चालेल. सकाळी 6.30 वाजता मंगल वादनासह शहनाई कार्यक्रम, भरतनाट्यम, 8.30 वाजता जत्रा उत्सव ध्वजारोहण, 9.00 वाजता अमनवरा पूजन होणार आहे. दुपारी 4.00 वाजता महिलांच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमासोबतच 4.30 वाजता पंचधातूच्या 23 फूट उंच सोन्याने मढवलेल्या रथात शिवाच्या चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मुलींनी एकत्र रथ ओढणे ही येथील खासियत असल्याचे सांगितले जाते.

यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आकर्षक सजवलेल्या स्टेजचे उद्घाटन करण्यात आले असून तेथे मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाशिवरात्री उत्सवाला दोन लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. चालताबोलता देव म्हणून ओळखले जाणारे श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांनी येथे नित्य दासोह अन्नसंतर्पण सोहळ्याला २०१५मध्ये सुरुवात केली. तेंव्हापासून येथे अखंड अन्नदासोह चालतो.

विजयपूरच्या शिवगिरी क्षेत्राला दर महाशिवरात्रीला भक्त विशेष पूजा करतात आणि शुद्ध होतात. तसेच घरी बनवलेल्या मिठाई, फळे, नैवैद्य देवाच्या मूर्तीला दाखवून उपवास सोडतात. विद्युत दिव्यांनी झळकणारा शिव, प्रेक्षकांना भक्तीची प्रेरणा देतो.

विजयकुमार सारवाड, इन न्यूज, विजयपूर.

Tags: