Belagavi

बेळगावात आरएल लॉ कॉलेजतर्फे राष्ट्रीय म्यूट कोर्ट स्पर्धा

Share

बेळगावातील कर्नाटक लॉ संस्थेच्या राजा लखमगौडा विधी महाविद्यालयातर्फे येत्या 8 ते 10 मार्चपर्यंत एम. के. नंबियार स्मृती 14वी राष्ट्रीय म्यूट कोर्ट (अभिरूप न्यायालय) स्पर्धा आयोजित केली आहे. देशभरातील विविध कायदा महाविध्यालयांचे 40 संघ यात भाग घेणार आहेत.

बेळगावात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केएलएस संस्थेचे सचिव ऍड. एस. व्ही. गणाचारी यांनी ही माहिती देऊन सांगितले की, भारताचे माजी ऍटर्नी जनरल व आर. एल. लॉ कॉलेजचे माजी विध्यार्थी पद्म विभूषण के. के. वेणुगोपाल यांनी ही म्यूटकोर्ट स्पर्धा प्रायोजित केली आहे. येत्या शुक्रवारी सकाळी म्यूट कोर्ट स्पर्धेचे उद्घाटन कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाचे न्या. अनिल कट्टी यांच्याहस्ते होईल. त्यानंतर तीन दिवस स्पर्धा घेण्यात येईल. रविवारी सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या स्पर्धेच्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्या. इ. एस. इंदिरेश उपस्थित राहतील. केएलएस संस्थेचे अध्यक्ष अनंत मंडगी अध्यक्षस्थानी असतील.

गणाचारी पुढे म्हणाले की, म्यूट कोर्ट स्पर्धेसाठी एकूण 1,35000 रुपयांची बक्षिसे देण्यात येतील. यात विजेत्या संघाला 50 हजार, उपविजेत्या संघाला 30 हजार, बेस्ट मेमोरियल 15 हजार, बेस्ट स्पीकर 15 हजार, बेस्ट महिला स्पीकर 15 हजार, बेस्ट रिसर्चर 10 हजार, बेस्ट म्युटर 6,050 हजार आदी बक्षिसांचा समावेश आहे. स्पर्धेत भारतातील 10 राज्यातील एकूण 40 संघ भाग घेणार असून त्यात नॅशनल लॉ स्कूलच्या 5 संघांचा सहभाग असेल. 30 वकील व कायदेतज्ज्ञ परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. याप्रसंगी हायकोर्ट वकील व केएलएस संस्थेचे चेअरमन प्रदीप सावकार व अन्य मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आरएल लॉ कॉलेजचे प्राचार्य अनिल हवालदार व अन्य उपस्थित होते.

Tags: