Belagavi

निवृत्त प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ राजकारणात उतरणार?

Share

बेळगावचे जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक आयुक्त म्हणून कार्याचा मोहरा उमटवलेले निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी एम. जी. हिरेमठ सक्रिय राजकारणात उतरण्यास सज्ज झाले आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत बेळगाव मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळ्वण्यासाठी ते एक प्रबळ इच्छुक आहेत.

कोविड काळात बेळगाव जिल्ह्यात विक्रमी संख्येने कोविड लसीकरण मोहीम राबवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शाबासकी मिळवणारे एम. जी. हिरेमठ यांनी बेळगाव जिल्ह्यात प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. नुकतीच त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांची भेट घेऊन आपला मनोदय व्यक्त केला आहे. निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या राजकारण प्रवेशाने बेळगाव लोकसभा मतदारसंघाचा नूरच पालटला आहे.

यापूर्वी माजी आयपीएस अधिकारी भास्कर राव यांना भाजपने उमेदवारी दिली होती. पण आता बेळगावचे निवृत्त आयएएस अधिकारी एम. जी. हिरेमठ यांना आकर्षित करणाऱ्या भाजपने त्यांना बेळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा घाट घातला आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान खासदार मंगला अंगडी यांच्यासह अनेक तिकीट इच्छुक आहेत. मात्र भाजपचे नेते योग्य अन विजयी होऊ शकणाऱ्या उमेदवाराच्या शोधात धडपडत आहेत.

बेळगावचे जिल्हाधिकारी असताना, एम.जी. हिरेमठ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त, 17 सप्टेंबर 2021 रोजी बेळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी 3 लाख कोविड लसींचे यशस्वीपणे व्यवस्थापन करून लसीकरणात बेळगावला देशात दुसऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत.

बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेत 2 वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या हिरेमठ यांनी चन्नम्मा विद्यापीठाला 11 एकर जमीन, ग्रामपंचायत घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी अनेक गट्टम पंचायतींना 1000 एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. अनेक मुख्यमंत्री पदके जिंकली आणि अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.

कोरोनाच्या कठीण काळात लोकांच्या त्रासाला हिरेमठ यांनी प्रतिसाद देऊन त्यांना दिलासा दिला होता. बेळगावचे प्रादेशिक आयुक्त म्हणून सेवा बजावून ते निवृत्त झाले. पुढे ते जिल्ह्यातील तरुणांना केएएस, आयएएससारख्या स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण देत आहेत. प्रशासकीय सेवेचा भरपूर अनुभव असलेले एम. जी. हिरेमठ हे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले तर त्यांना जनतेची सेवा करणे अतिशय सोयीचे ठरणार आहे. मृदू स्वभावामुळे बेळगाव जिल्ह्यात त्यांचा चांगला जनसंपर्कही आहे. त्यामुळे भाजप नेत्यांकडून बेळगाव लोकसभा मतदारसंघातून एम. जी. हिरेमठ यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. अनेक भाजप नेते त्यांच्या पाठीशी आहेत. दरम्यान, त्यांना भाजप पक्षश्रेष्ठी उमेदवारी देणार का हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Tags: