Belagavi

बेळगावात मंडळांच्या मराठी नामफलकांवरही कर्नाटकी वक्रदृष्टी

Share

सतत मराठीच्या विरोधात गरळ ओकत कोल्हेकुई करणाऱ्या कन्नड संघटनांपुढे जिल्हा व महानगरपालिका प्रशासन झुकले आहे. बेळगावात मंडळांच्या मराठी नामफलकांवरही कर्नाटकी वक्रदृष्टी पडली असून, पालिकेने गुरुवारी सायंकाळी अनगोळमधील ‘जय महाराष्ट्र चौक’ नामफलक हटवला.

बेळगाव तालुक्यातील अनगोळ गावात लावण्यात आलेला ‘जय महाराष्ट्र चौक’ फलक महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रातोरात हटवला. विविध कन्नड समर्थक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर निदर्शने करत जय महाराष्ट्र नामफलक तत्काळ हटविण्याची मागणी केली. त्यानंतर महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हा नामफलक हटवला आहे.

करवे कार्यकर्त्यांनी अनगोळ चलो कार्यक्रम करण्याचा इशारा दिला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या सर्व कन्नड समर्थकांच्या लढ्याला कंटाळून महानगरपालिकेचे आयुक्त लोकेश यांच्या सूचनेनुसार नामफलक हटवला. 2014 मध्ये बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावात लावलेला ‘महाराष्ट्र राज्य’ असा बोर्ड काढण्यासाठी कन्नड आंदोलक भीमप्पा गडाद यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक हितासाठी तो बोर्ड काढण्याचे आदेश दिले होते. आता जय महाराष्ट्र चौकाच्या बोर्डाला जोरदार विरोध होत असल्याने तो काढल्याचे स्पष्टीकरण पालिकेने दिले आहे.

Tags: