कुंदानगरी बेळगावच्या प्रवेशद्वारावर आता जंगली हत्तीने धडक दिल्याने सगळ्यांचे धाबे दणाणले आहेत. शुक्रवारी पहाटे अलतगा गावाजवळ गजराजाने प्रवेश केल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली. स्थानिकांनी तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आहे.
होय, बेळगाव तालुक्यातील कंग्राळी आणि शाहूनगरजवळ शिवारात आज, शुक्रवारी पहाटे जंगली हत्तीचे दर्शन झाले. नंतर हाच हत्ती अलतगा गावाजवळ दिसला आणि उचगावकडे त्याने प्रस्थान केले. आपल्या परिसरात जंगली हत्ती पाहून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही बाब वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. त्यांनी हत्तीला पिटाळण्याचे प्रयत्न सुरु केले. काही नागरिकांनी फटाके फोडून हत्तीला पिटाळण्याचा प्रयत्न केला.
काही लोकांना पहिल्यांदाच शहरात आलेला जंगली हत्ती पाहून काळजी वाटत होती, तर काहींना हत्ती पाहण्याची उत्सुकता होती. हा हत्ती दोन दिवसांपूर्वी बेळगावजवळील महाराष्ट्र सीमेवरील कोवाड गावात दिसल्याचे सांगण्यात येत आहे. वन अधिकारी हत्तीला पकडून पुन्हा जंगलात सोडण्याच्या प्रयत्नात आहेत.


Recent Comments