बेळगाव महानगर पालिकेचा एकूण 43,661.35 लाख रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प आज अर्थसंकल्पीय बैठकीत मंजूर करण्यात आला. विरोधी सदस्यांनी मांडलेल्या आक्षेपानंतर पुरवणी अर्थसंकल्पात तुमच्या मागण्यांनुसार तरतूद केली जाईल असे आश्वासन महापौर सविता कांबळे यांनी दिल्यानंतर सर्वानुमते बजेट मंजूर करण्यात आले.
उत्तर कर्नाटकात सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या बेळगाव महापालिकेची अर्थसंकल्पीय बैठक आज, मंगळवारी पार पडली. महापौर सविता कांबळे अध्यक्षस्थानी होते. कर व अर्थ स्थायी समितीच्या अध्यक्षा वीणा विजापूरे यांनी बेळगाव पालिकेचा २०२४-२५ या वर्षाचा एकूण 43,661.35 लाख रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प मांडला. यात 43,661.35 लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरले असून, 43,653.63 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. खर्च वजा जाता 7.72 लाखांचे हे शिलकी अंदाजपत्रक आहे
या अर्थसंकल्पात मालमत्ता करातून 7350.20 लाख, इमारत बांधकाम परवानगीतून 200.00 लाख, इमारत बांधकाम परवानगी डेव्हलपमेंट चार्जमधून 1025.00 लाख, अवशेष निर्मूलनातून 230.00 लाख, हेस्कॉमकडून भूमिगत केबल जोडणीच्या शुल्कातून 1700.00 लाख, पालिका हद्दीतील रस्ते खोदाई शुल्कातून 125.00 लाख, घनकचरा संकलनातून 800.00 लाख, मालमत्ता नोंदणी अधिभार शुल्कातून 110.00 लाख असे विविध श्रोतातून एकूण 43,661.35 लाख रुपयांचे उत्पन्न गृहीत धरण्यात आले आहे.
खर्चात राज्य सरकारकडून मंजूर झालेल्या राज्य वित्त अयोग्य अनुदानातून पालिका अधिकारी. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च, शहर सफाईसाठी 2800.00 लाख रु., थेट नेमणूक झालेल्या पौरकार्मिकांच्या वेतनासाठी 1800.00 लाख रु., शास्त्रीय घनकचरा व्यवस्थापनासाठी 400.00 लाख रु., पथदीपांच्या देखभालीसाठी 250.00 लाख रु., रस्ते, गटारी, फुटपाथ, पावसाच्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी 1050.00 लाख रु., भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी 110.00 लाख रु., क्रीडा उपक्रमांसाठी 14.98.00 लाख रु.ची तरतूद करण्यात आली आहे.
भांडवली खर्चात नवे संगणक व अन्य आवश्यक साहित्य खरेदीसाठी 160.00 लाख रु., सर्व 58 प्रभागात रस्ते निर्माणासाठी 500.00 लाख रु., काँक्रीट रस्त्यांसाठी 300.00 लाख रु., गटार बांधकामासाठी 50.00 लाख रु., पालिकेच्या खुल्या जागांच्या संरक्षणासाठी 80.00 लाख रु., शहरातील चौकांच्या सौंदर्यीकरणासाठी 75.00 लाख रु. अशा मूलभूत सुविधांसाठी एकूण 1005.00 लाख रु., सर्व 58 प्रभागांत विविध आवश्यक मूलभूत सुविधांसाठी 1000.00 लाख रु., असे एकंदर सर्व मूलभूत सुविधांसाठी 2005.00 लाख रु., ड्रेनेज दुरुस्ती आणि नवीन ड्रेनेज कामांसाठी 650.00 लाख रु. अशा विविध कामांसाठी एकूण 43,653.63 लाखांचा खर्च अपेक्षित धरला आहे.
अर्थसंकल्प मांडताना कर व अर्थ स्थायी समिती अध्यक्षा वीणा विजापुरे म्हणाल्या की, बेळगाव शहराचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी तसेच शहरातील सर्व वर्गांच्या विशेषतः मागासवर्ग, ज्येष्ठ नागरिक, अनुसूचित जाती-जमाती, महिला आणि मुले, दिव्यांगांच्या प्रगतीसाठी अनेक योजना अर्थसंकल्पात मांडण्यात आल्या आहेत. शहरातील रस्ते, चौक, बसथांबे, बाजारपेठ सुस्थितीत ठेवून पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून जनस्नेही कार्यक्रम आखून शहरातील संघ-संस्था, विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे सल्ले-सूचना घेऊन हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. त्याला मंजुरीसाठी सभागृहापुढे ठेवण्याची विनंती महापौरांना केली. त्यानुसार महापौर सविता कांबळे यांनी अर्थसंकल्पाला मंजुरी देण्याची विनंती सभागृहाला केली.
त्यावर विरोधी पक्षनेते मुजम्मिल डोणी यांनी, अर्थसंकल्पात केवळ सत्ताधारी सदस्यांच्या प्रभागांसाठी अधिक निधीची तरतूद केल्याचा आक्षेप घेत हा अर्थसंकल्प रुलिंग ग्रुपचा असल्याची टीका केली. सर्व ५८ नगरसेवकांना विश्वासात घेऊन अर्थसंकल्प मांडण्याची बेळगाव पालिकेची परंपरा राहिल्याचे सांगून ती यावेळी पाळली गेली नसल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. विरोधी गटातील कर व अर्थ स्थायी समितीच्या सदस्यांनी मागणी करूनही अर्थसंकल्पाची प्रत दिली नसल्याने त्यांना त्याचा अभ्यास करता आला नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
त्यावर कर व अर्थ स्थायी समिती अध्यक्षा वीणा विजापुरे यांनी समितीच्या बैठकीसाठी विरोधी गटातील सदस्य नगरसेवकांना अधिकाऱ्यांनी फोन केला होता. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे सांगितले. त्यावर डोणी यांनी कुठल्या अधिकाऱ्याने फोन केला होता हे सांगण्याची मागणी केली. त्यावर महापौर सविता कांबळे यांनी, कोण अधिकाऱ्यांनी फोन केला होता हे सांगण्याची सूचना केली. त्यावर महसूल विभागाच्या एका अधिकाऱ्याने आपण सर्व सदस्यांना फोन केला होता, पण त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याने त्यांना मेसेजही केल्याचे सांगितले.
त्यावर मुजम्मिल डोणी यांनी पुन्हा, एवढी गडबड करून अर्थसंकल्प मांडण्याची काय गरज आहे असा सवाल करत अभ्यासासाठी अर्थसंकल्पाची प्रत का दिली नाही असा सवाल केला.
त्यावर सत्ताधारी गटाचे हनुमंत कोंगाळी यांनी, कर व अर्थ स्थायी समिती अध्यक्षांनी पालिकेच्या प्रथेप्रमाणे विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, आजी-माजी नगरसेवकांची मते, सल्ले-सूचना विचारात घेऊनच बजेट तयार केले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी डोणी आणि कोंगाळी यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
यावेळी विरोधी गटातील नगरसेविका रेश्मा बैरकदार यांनी आपण सार्थ स्थायी समितीची सदस्य असूनही मागणी करूनही अर्थसंकल्पाची प्रत दिली नसल्याची तक्रार केली. प्रत दिल्यास प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचेल, दुपारी बैठक घेऊ, त्यावेळी या असे सांगण्यात आले. पण बैठकीला बोलावलेच नाही असे त्या म्हणाल्या. त्यावर सत्तारूढ गटातील रवी धोत्रे यांनी आक्षेप घेऊन तुम्ही अर्थ समितीच्या सदस्या असल्याने समितीच्या बैठकीतच तुमचे आक्षेप मांडणे गरजेचे होते, असे सांगितले. त्यावर सत्ताधारी आणि विरोधी गटात वादावादी झाली. त्यावर कायदा अधिकाऱ्यांनी माहिती देण्याची मागणी धोत्रे यांनी केली. कायदा अधिकाऱ्यांनी बैरकदार अर्थ स्थायीच्या सदस्या आहेत. त्यांनी बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरीही दिली आहे. त्यांना काही आक्षेप होते तर त्यांनी बैठकीतच मांडायला हवे होते, असे सांगितले.

यावेळी हस्तक्षेप करत विधान परिषद सदस्य साबण्णा तळवार म्हणाले की, नियमाप्रमाणे अर्थ स्थायी समितीत बजेट मंजूर करून सभागृहात मांडावे लागते. तोपर्यंत ते कोणालाही देता येत नाही. आता आपल्याला बजेटची प्रत देण्यात आली आहे. त्यावर काही आक्षेप असतील, आणखी काही तरतुदी करावयाच्या असतील तर पुरवणी अर्थसंकल्पात त्या करता येतात. त्यादृष्टीने नगरसेवकांनी सूचना करण्यात आवाहन केले. हे बजेट बेळगावच्या विकासाला पूरक असून त्याला आपला पाठिंबा आहे असे त्यांनी सांगितले.
तरीही मुजम्मिल डोणी आपल्या मुद्द्यावर असून राहिले. त्यामुळे रवी धोत्रे व त्यांच्या वाकयुद्ध झाले. यावेळी माजी सत्तारूढ गटनेते राजशेखर डोनी यांनी सर्व 58 प्रभागांसाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे, आणखी काही मागण्या असतील तर त्या पुरवणी अर्थसंकल्पात घेता येतील असे सांगून बजेटचे स्वागत करून पाठिंबा व्यक्त केला.
अखेर महापौर सविता कांबळे यांनी पुरवणी अर्थसंकल्पात नगरसेवकांच्या मागण्यांची दखल घेऊ असे सांगून बेळगाव पालिकेचा 2024-25 चा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर झाल्याचे जाहीर केले.


Recent Comments