Belagavi

कुंदानगरीत शांतता राखल्याबद्दल 9 पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार

Share

22 जानेवारी रोजी राममंदिराच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यादरम्यान बेळगाव शहरात शांतता राखण्यात यश मिळविल्याबद्दल आयुक्त सिद्रामप्पा यांनी 9 पोलिस कर्मचाऱ्यांचा आज खास सत्कार केला.

होय, गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोलीस सार्वजनिक सभा-समारंभ, आंदोलने, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना सुरक्षा पुरवतात. दोन समाजातील दंगलींमुळे समाजात अशांतता निर्माण होते, पण खाकी पांघरलेले जांबाज पोलीस अशावेळी समाजाच्या सुरक्षेसाठी स्वतःची पर्वा न करता पुढे सरसावतात. असाच प्रसंग बेळगावात 22 जानेवारीला उदभवला. अनेकांच्या बलिदानातून राम मंदिर लोकार्पणचे स्वप्न साकार झाले. देशभरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. राम जप-तप सोहळा पार पडला. बेळगाव शहरातही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यावेळी संवेदनशील दरबार गल्ली व देशपांडे पेट्रोल पंपाजवळ कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

नेमक्या याची ठिकाणी रात्री दोन गटात संघर्ष झाला. मात्र वेळीच पावले उचलत तो रोखण्यात पोलिसांना यश आले. शहरात शांतता राखण्यासाठी मार्केटचे एएसआय महांतेश मठपती, लक्ष्मण कडोलकर, ए. व्ही. नविनकुमार, नागराज भीमप्पगोळ, मल्लिकार्जुन गुंजीकर, आशीर अहमद जमादार, केदारी नागराळ, मनोहर पाटील, राजू ठकाप्पगोळ यांनी ही कामगिरी बजावली. त्याबद्दल आज पोलीस मैदानावर झालेल्या परेडमध्ये पोलीस आयुक्त सिद्रामप्पा यांनी त्यांचा खास सत्कार करून गौरविले.

यावेळी बोलताना पोलीस आयुक्त सिद्रामप्पा म्हणाले की, 22 जानेवारी रोजी राममंदिराच्या उद्घाटनप्रसंगी शहरातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दरबार गल्ली व देशपांडे पेट्रोल पंप या संवेदनशील भागात सुरक्षा राखण्यासाठी सहकार्य केले आहे. ते प्रशंसनीय आहे.
यावेळी डीसीपी स्नेहा, डीसीपी रोहन जगदीश, एसीपी, सीपीआय यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Tags: