श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना, आणि वैश्यवाणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समादेवी गल्ली बेळगाव येथील श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला आज मंगळवारी मोठ्या भक्तीमय वातावरणात व उत्साहात प्रारंभ झाला.
सकाळी प्रमुख पाहुण्या शहापूर सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरूपा इनामदार यांच्या हस्ते फीत कापून श्री देवी दरबाराचे उद्घाटन करण्यात आले. त्यांच्याहस्ते श्री समादेवीची आरती करण्यात आली. उद्घाटन समारंभात व्यासपीठावर वैश्यवाणी समाजाचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी, सचिव अमित कुडतुरकर, वैश्यवाणी युवा संघटनेचे अध्यक्ष रोहन जुळवी, रवी कलघटगी, विश्वस्त मोहन नाकाडी, मोतीचंद दोरकाडी, वैशवाणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. अंजली किनारी, सेक्रेटरी वैशाली पालकर, उपाध्यक्ष वर्षा सटवाणी उपस्थित होते.
दत्ता कणबर्गी यांनी स्वागत केले. अंजली किनारी व रोहन जुळवी यांची भाषणे झाली. प्रमुख पाहुण्या स्वरूपा इनामदार यांनी ‘कुटुंबातील स्त्री’ या विषयावर महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जन्म लग्न व मृत्यू हे तीन वेगवेगळे टप्पे परमेश्वराच्या हाती आहे. पण मोठ्या भाग्यानेच आपणाला स्त्रीजन्म मिळाला असून, कुटुंबातल्या प्रत्येकाचे सुख व आनंद हे स्त्रीवर अवलंबून असते. घरात जर स्त्री व पुरुष एकमेकांना पूरक असते तर घरातले वातावरण आनंदी राहील. प्रत्येक घरातील पती-पत्नीने एकमेकांचे सुखदुःख वाटून घेत त्यांच्या गुणदोषासह एकमेकांचा आदर केला पाहिजे. आपापले दोष आपण समजून घेऊन जर ते आपणच काढून टाकण्याचा प्रयत्न केला, तर जीवन आनंददायी होईल, असे सांगितले.
उज्वला बैलुर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सेक्रेटरी वैशाली पालकर यांनी आभार प्रदर्शन मानले.


Recent Comments