Belagavi

बेळगाव अर्बन सोसायटीचे चेअरमन अरुणराव बेडेकर यांचे निधन

Share

मूळचे शहापूर कचेरी गल्लीतील व आता केळकर बाग, बेळगाव येथील रहिवासी व प्रतिष्ठित कापड व्यापारी आणि बेळगाव अर्बन सौहार्द सहकारी संघाचे अध्यक्ष अरुणराव ज. बेडेकर यांचे आज, मंगळवारी वार्धक्याने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. आजारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, जावई, बंधू, भावजय आणि पुतणे असा मोठा परिवार आहे.

1976मध्ये बेळगाव अर्बन सोसायटी सुरू झाल्यापासून बेडेकर यांनी संचालक म्हणून काम पाहिले. तीन वेळा त्यांनी अध्यक्षपद यशस्वीपणे भूषविले होते. त्यांच्या कारकीर्दीत पतसंस्थेच्या शाखांचा विस्तार करण्यात आला. पतसंस्था मोठी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. मेणशी गल्लीत त्यांचे वडिलार्जित कापड दुकान आहे. गेली अनेक वर्षे त्यांनी या दुकानाची धुरा सांभाळली.

सचोटीने व्यवहार करणारा व्यापारी अशी त्यांची ओळख होती. रा. स्व. संघाचे ते ज्येष्ठ स्वयंसेवक होते. आपल्या मनमिळावू स्वभावाने त्यांनी मोठा लोकसंग्रह जमविला होता. अनेक गरजूंना त्यांनी मदतीचा हात दिला होता. त्यांच्या जाण्याने सहकार तसेच बेळगावातील व्यापारीवर्गात हळहळ व्यक्त होत आहे.

Tags: