Belagavi

बेळगावात माघी गणेश जयंती श्रद्धा-भक्तिभावाने साजरी

Share

माघ शुद्ध चतुर्थीनिमित्त आज बेळगाव शहर व परिसरात माघी गणेश जयंती श्रद्धा-भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्त ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

माघ महिन्यात येणाऱ्या चतुर्थीलाही गणेश जयंती साजरी करण्याची प्रथा भारताच्या अनेक भागात आहे. तद्वत आज बेळगाव शहर व परिसरात सर्व गणेश मंदिरात माघी गणेश जयंती अत्यंत भक्तिभावाने साजरी करण्यात आली. बेळगाव शहर व तालुक्यातील विविध गणेश मंदिरांना माघी गणेश जयंतीनिमित्त रंगरंगोटी करून आकर्षक सजविण्यात आले होते. विविधरंगी फुले आणि माळांनी मंदिराच्या गाभाऱ्यांची आकर्षक, नयनरम्य सजावट करण्यात आली होती. त्यामुळे सर्वच गणेश मंदिरात प्रसन्न, चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते.

बेळगावातील भेंडीबाजार-पांगुळ गल्ली मोतीलाल चौकातील श्री सिद्धिविनायक मंदिरात आज माघी गणेश जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. गणेश जयंतीनिमित्त आज मंदिरात अभिषेक, गणहोम आदी कार्यक्रम झाले. सायंकाळी महाआरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आल्याचे मंदिर समितीचे पदाधिकारी रोहित रावळ यांनी सांगितले.

सदाशिवनगरातील श्री हरिद्रा गणेश मंदिरात आज माघी गणेश जयंतीचा भक्तिभावपूर्ण माहौल पहायला मिळाला. गेल्या २० वर्षांपासून या मंदिरात माघी गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. याबाबत इन न्यूजला माहिती देताना मंदिर समितीचे सचिव सागर वर्पे यांनी सांगितले की, गेल्या २० वर्षांपासून या मंदिरात माघी गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आणि महाप्रसाद ठेवण्यात येतो. गणेशाचे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी केवळ सदाशिवनगरच नव्हे तर हनुमान नगर, कुवेम्पूनगर, नेहरूनगर, जाधवनगर, टीव्ही सेंटर, कंग्राळी खुर्द व बुद्रुक आदी लांबच्या ठिकाणचे भाविकही येतात. आज दुपारी वाटप केलेल्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, बेळगावातील चन्नम्मा चौक गणेश मंदिर, हिंडलगा विनायक मंदिर यासह शहापूर, खासबाग, बाजार गल्ली-वडगाव, टिळकवाडी सिद्धी विनायक मंदिर आदी अनेक ठिकाणच्या गणेश मंदिरातही माघी गणेश जयंती उत्साह आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली.

Tags: